मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिल्ली

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून, आता त्या पूर्णवेळ राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापतींकडे सोपवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.
उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. विक्रमी मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर त्या आता विधानसभेच्या अधिकृत सदस्य बनल्या आहेत. नियमानुसार, विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांना वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेचा राजीनामा देणे अनिवार्य होते.
सुनेत्रा पवार यांनी आता राज्याच्या राजकारणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बारामतीचा गड राखल्यानंतर आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळताना, त्यांनी खासदारकी सोडून पूर्णतः विधिमंडळात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता राज्यसभेची एक जागा रिक्त झाली असून, तिथे राष्ट्रवादी कोणाची वर्णी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार यांचा हा राजीनामा म्हणजे त्यांच्या राजकीय प्रवासातील एक नवा अध्याय मानला जात आहे. बारामतीच्या लोकप्रतिनिधी म्हणून आता त्या विधानसभेत कशा प्रकारे आपली भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS