एस.एम.युसूफ़ यांचा 'सा. युवा लोकमित्र' कडून 'ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर' पुरस्काराने गौरव बीड: शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांना नुकतेच सा.

एस.एम.युसूफ़ यांचा ‘सा. युवा लोकमित्र’ कडून ‘ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर’ पुरस्काराने गौरव
बीड: शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांना नुकतेच सा. युवा लोकमित्र परिवाराकडून संपादक ताहेर शेख यांनी ‘ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर’ पुरस्कार देऊन गौरविले. गेल्या १३ वर्षांच्या पत्रकारिता प्रवासात युसूफ़ यांना आतापर्यंत ७ विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, या पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बार्शी रोडवरील ताज पॅलेस येथे रंगलेल्या भव्य सोहळ्यात राज्यमंत्री दर्जा असलेले वक्फ़ महामंडळाचे चेअरमन समीर काज़ी, बीडच्या नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला ताई मोराळे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व लेखक अल्ताफ दादासाहेब शेख, धडाडीचे नेते भागवतराव तावरे, दैनिक रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेशराव सावंत आणि दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभवराव स्वामी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे उपस्थित होते.
पत्रकारितेचा गौरवशाली प्रवास एस.एम.युसूफ़ यांना यापूर्वी दिवंगत हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी चंपावतीरत्न पुरस्कार, जीवन स्फूर्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जिज्ञासा गुरुकुल संयुक्त पुरस्कार, मातृभूमी प्रतिष्ठान पुरस्कार, पद्मपाणी प्रतिष्ठान पुरस्कार, निर्भिड पत्रकार संघ पुरस्कार आणि दैनिक प्रभास केसरी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
मान्यवरांची मते अन् वडिलांचे आनंदाश्रू या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते युसूफ़ यांचे वडील मुहम्मद अब्दुल रऊफ यांची उपस्थिती. गेल्या काही वर्षांपासून वॉकरशिवाय चालू न शकणारे रऊफ हे मुलाचे कौतुक पाहण्यासाठी खास उपस्थित राहिले होते. मंचावरून सूत्रसंचालक मुहम्मद अब्दुल रहीम उर्फ गुलाम साकिब, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नजमा सुलताना उस्मानी आणि दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी युसूफ़ यांच्या निर्भीड पत्रकारितेविषयी व्यक्त केलेल्या गौरवोद्गारांनी त्यांचे वडील भारावून गेले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हा भावुक क्षण पाहून सूत्रसंचालक गुलाम साकिब यांनी व्यासपीठावरून खाली येत, “काका धन्य आहात तुम्ही, तुमच्या पोटी परखड लेखणीच्या माध्यमातून उत्कृष्ट समाजकार्य करणारा हिरा जन्मला,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

COMMENTS