भोकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या आणि सर्वांना सत्तेत समान वाटा मिळावा या स्वप्नपूर्तीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण अत्यावश्यक असल्याचे प

भोकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या आणि सर्वांना सत्तेत समान वाटा मिळावा या स्वप्नपूर्तीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केले. मुंबईतील आझाद मैदान येथे होणार्या ‘वज्रमूठ आंदोलनाला’ महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
भोकर तालुक्यातील मौजे रिठा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार उत्तम बाबळे, जेष्ठ पत्रकार एल. ए. हिरे, शाहीर के. वाय. देवकांबळे, शिक्षणाधिकारी फोले, धोंडोपंत बनसोडे तसेच फकिरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सखाराम वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. भरांडे पुढे म्हणाले की, फकिरा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा जयंती उत्सव प्रेरणादायी असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजबांधवांना दिशा मिळते. मात्र, मातंग समाजाचा शैक्षणिक आणि नोकरीतील सहभाग अत्यल्प असल्याने विद्यमान आरक्षणातून अपेक्षित न्याय मिळत नाही. त्यामुळे समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ, ब, क, ड अशा आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 27 एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार्या वज्रमूठ आंदोलनात राज्यभरातील तरुण व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून रिठा व भोकर तालुक्यातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचाही उल्लेख करत, 2019 मध्ये त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला होता, मात्र नंतर या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली. या प्रश्नावर त्यांनी पुन्हा ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही प्रा. भरांडे यांनी केले. कार्यक्रमात उत्तम बाबळे, शिक्षणाधिकारी फोले व सखाराम वाघमारे यांचीही भाषणे झाली. यावेळी सरपंच कविता करंदीकर, शाहीर माधव वाघमारे, माजी सरपंच माधव कदेवाड, राजेश्वर नागलवड, रमेश संगपवाड, शाहीर बालाजी वाघमारे, दिलीप पोतरे, संजय चिंचोलकर, अनिल कराळे, संतोष सूर्यवंशी, श्याम वाघमारे, गायकवाड (दिशा कॉम्प्युटर) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS