बीड : मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात आज जोरदार एल्गार मोर्चा काढण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या प्रश

बीड : मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात आज जोरदार एल्गार मोर्चा काढण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. तळपत्या उन्हातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह आणि निर्धार कायम दिसून आला.
दुपारी 2.30 वाजता किल्ला मैदान येथून या मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच परिसरात मोठी गर्दी जमली होती. आरक्षण आमचा हक्क आहे, न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोर्चाच्या अग्रभागी एक लहान मुलगी काळे कपडे परिधान करून प्रतीकात्मक निषेध नोंदवत होती. तिच्या उपस्थितीमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आणि वातावरण भावनिक झाले. मोर्चामध्ये युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकजुटीने आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोर्चा किल्ला मैदान येथून सुरू होऊन बलभिम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशीरगंज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. संपूर्ण मार्गावर मोर्चेकर्यांची लाट उसळल्याचे चित्र दिसत होते. व्यापारी व नागरिकांनीही या आंदोलनाची दखल घेत परिसरात काही काळ तणावपूर्ण पण शांत वातावरण अनुभवले. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाने जाहीर केलेले 5 टक्के मुस्लिम आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला. या निर्णयामुळे समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासावर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देऊन आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. या मोर्चामुळे बीड शहरात काही काळ वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. मात्र पोलिस प्रशासनाने बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आरक्षणाच्या मागणीसाठीचा हा एल्गार मोर्चा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक मानला जात असून, पुढील काळात या प्रश्नावर समाजाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS