चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांच्या नेतृत्वाखाली

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘तामिळगा वेत्री कळघम’ हा पक्ष 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला 118 चा आकडा गाठण्यात तो अपुरा पडला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणे अनिवार्य ठरत आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर ‘अण्णाद्रमुक’ पक्षात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत असंतोष निर्माण झाला आहे. पक्षाच्या 47 आमदारांपैकी अनेक जण सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही आमदारांचा स्पष्ट कल विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याकडे झुकलेला दिसतो. माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील गटबाजी उघडपणे समोर येत असून, वेळेत निर्णय न घेतल्यास मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अण्णाद्रमुकमधील 30 हून अधिक आमदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. हे आमदार विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत. या संभाव्य बंडाचे नेतृत्व सी. व्ही. षण्मुगम करत असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे पक्षाच्या उच्च नेतृत्वावर दबाव वाढला आहे. आमदारांची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र शेवटच्या क्षणी ती बैठक पुढे ढकलण्यात आल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. तामिळनाडू विधानसभेतील एकूण 234 जागांपैकी बहुमतासाठी 118 जागा आवश्यक आहेत. ‘तामिळगा वेत्री कळघम’कडे 108 जागा असल्याने त्यांना किमान 10 आमदारांचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे विविध पक्षांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. ‘द्रमुक’ आणि ‘अण्णाद्रमुक’ या दोन्ही प्रमुख पक्षांतील काही गटांशी चर्चा सुरू असल्याचे समजते. विशेषतः अण्णाद्रमुकमधील असंतुष्ट आमदार हे विजय यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतात.
काँगे्रसचा विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा
‘द्रमुक’ आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने 5 जागा जिंकल्या आहेत. तब्बल 50 वर्षांची द्रमुकसोबतची युती काँगे्रसने बुधवारी तोडत विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत तामिळनाडूमध्ये स्पष्ट बहुमत कोणालाही नसल्याने राजकीय अनिश्चितता कायम आहे.

COMMENTS