बीड : श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची भव्य शोभायात्रेद्वारे उत्साहात सुरुवात झाली. निनगुर गावात

बीड : श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची भव्य शोभायात्रेद्वारे उत्साहात सुरुवात झाली. निनगुर गावात काय वाजत गाजत… बंकटस्वामींचा सोहळा गाजत..! या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
सकाळी 9 वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिक्षक कॉलनी येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात ही शोभायात्रा कीर्तन मंडपापर्यंत पोहोचली. यावेळी पिवळ्या साड्या परिधान केलेल्या सुमारे 1100 कलशधारी सुवासिनी महिला व कुमारीका सहभागी झाल्या होत्या. तसेच बंकटस्वामी वारकरी शिक्षण संस्थेतील बालवारकर्यांच्या पाऊलीच्या खेळाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत-महंतांच्या हस्ते टाळ, वीणा, मृदंग, पालखी आणि ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महादेव महाराज चाकरवाडीकर, हरिहर भारती महाराज, श्रीहरी महाराज पवार, प्रशांत महाराज क्षीरसागर, सत्यवान महाराज लाटे, विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी, नाना महाराज कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना विष्णुपंत महाराज लोंढे यांनी संत बंकटस्वामी महाराजांचे वारकरी संप्रदायातील योगदान अतुलनीय असल्याचे सांगितले. सत्यवान महाराज लाटे यांनी संतांच्या पुण्यतिथीत सेवा करण्याची संधी ही भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद केले. तर श्रीहरी महाराज पवार म्हणाले की, बंकटस्वामी महाराजांनी वारकरी कीर्तनाची पताका देशभर फडकवली. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी हाताला पडेल ती संतसेवा करा असा संदेश दिला. तसेच महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी आठ दिवस राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आठ दिवस चालणार्या या उत्सवात रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या रसाळ कथेमुळे भक्तांना आध्यात्मिक आनंद लाभत आहे. कीर्तन, भजन, हरिपाठ यांसह जनप्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक-वादक आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बंकटस्वामी संस्थानच्या वतीने महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, विश्वस्त, गावकरी व अन्नदान समितीने केले आहे. वारकरी संप्रदायाचे ‘भक्तिसूर्य’ म्हणून संत बंकटस्वामी महाराजांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांच्या कार्यामुळेच वारकरी संप्रदायाचे भव्य आणि देखणे स्वरूप आज पाहायला मिळते. बंकटस्वामी महाराजांनी वारकरी कीर्तनाची पताका देशात फडकवली, असे श्रीहरी महाराज पवार यांनी सांगितले.

COMMENTS