नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरात ड्रेनेज व रस्त्यांची कामे सुरू असताना विजयनगर, तारोडा (बु.) येथील सर्वे क्रम

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरात ड्रेनेज व रस्त्यांची कामे सुरू असताना विजयनगर, तारोडा (बु.) येथील सर्वे क्रमांक 70 मधील अभियांत्रिकी सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात विकासनगर सोसायटीतील सुमारे 25 टक्के भाग अजूनही ड्रेनेज सुविधेपासून वंचित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या माहितीनुसार, पूर्वेकडील सूर्यवंशी यांच्या घरापासून पश्चिमेकडील डॉ. दवणे यांच्या घरापर्यंत तसेच उत्तरेकडील धुतराज यांच्या घरापासून दक्षिणेकडील अंबुलगेकर यांच्या घरापर्यंत, तसेच दुसर्या लाईनमध्ये तामटे ते कावळे यांच्या घरांपर्यंत सुमारे 25 घरांमध्ये ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी घरगुती सांडपाणी परिसरात साचत असून नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात नाल्याचीही सुविधा नसल्याने परिसरात डुकरांचा वावर वाढला असून डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात हा भाग रोगराईचे केंद्र बनू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत नांदेड शहरासाठी मोठा निधी मंजूर असूनही विकासनगरमधील या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोसायटीने ड्रेनेजसाठी 27 डिसेंबर 2026 रोजी पहिला अर्ज दिल्यानंतर अनेक निवेदने, पाठपुरावे करूनही प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. महापौर, नगरसेवक, कार्यकारी अभियंता, आयुक्त आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडे वारंवार मागणी करूनही समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. दि. 16 एप्रिल रोजी सोसायटी सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडली. यावेळी गटनेते प्रशांत इंगोले तसेच नगरसेवक प्रतिनिधी जोंधळे उपस्थित होते. महापौरांनी पाहणीचे आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी व कंत्राटदाराने प्रत्यक्ष पाहणी केली; मात्र त्यातून कोणताही ठोस मार्ग निघाला नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. नागरिकांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला असून, दक्षिण-उत्तर मुख्य ड्रेनेज लाईन आवश्यक खोलीवर टाकण्यात आलेली नसल्याने लेव्हल जुळत नाही. किमान चार मीटर खोली आवश्यक असताना प्रत्यक्षात कमी खोलीवर लाईन टाकण्यात आल्याने उर्वरित भागातील सांडपाणी मुख्य लाईनमध्ये सोडणे अशक्य होत आहे. दरम्यान, विकासनगर येथे सध्या रस्त्याचे काम सुरू असून पहिला सिमेंट लेयर टाकण्यात आला आहे. मात्र योग्य पाणी न टाकल्याने सिमेंट व गिट्टी उघडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोसायटीच्या वतीने प्रशासनाकडे रस्त्याचे काम तात्काळ थांबवून मुख्य ड्रेनेज लाईन आवश्यक खोलीवर टाकावी, पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा किंवा आवश्यक जागा अधिग्रहित करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पाण्याच्या टाकीमागील भागात नवीन ड्रेनेज लाईन टाकावी आणि पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तातडीने मंजूर करून काम सुरू करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विकासनगर सोसायटीतील नागरिकांनी दिला आहे.
पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही
विकासनगरच्या ओपन स्पेसमध्ये महानगरपालिकेची मोठी पाण्याची टाकी असूनही संबंधित 25 घरांना अद्याप पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन देण्यात आलेली नाही. नव्याने निवडून आलेल्या महापौरांनी भेटीदरम्यान पाइपलाइनचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र एक महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS