Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रचंड गरीबी, अल्पदृष्टी आणि वडिलांचे छत्र हरपले तरीही हार नाही; करण गायकवाड एमपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण

अर्धापूर : प्रचंड गरीबी, अल्पदृष्टी आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपणे-या तिहेरी संकटांनाही न जुमानता पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील करण तुकाराम गा

पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
पायाभूत विकासाला नवी दिशा देणारे अधिकारी; शरद राजभोज व संतोष शेलार यांची सचिवपदी नियुक्ती
‘ओम’ यांनी धर्मदाय आयुक्त पदाचे शिखर गाठावे-इंजी. अजिंक्य आनेराव

अर्धापूर : प्रचंड गरीबी, अल्पदृष्टी आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपणे-या तिहेरी संकटांनाही न जुमानता पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील करण तुकाराम गायकवाड याने जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होत त्याने महसूल सहाय्यक (वर्ग-3) पद मिळवले आहे. विशेष म्हणजे, हे यश मिळवूनही तो इथेच थांबणार नसून वर्ग-1 अधिकारी होण्याचे मोठे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून पुढील तयारी सुरू ठेवणार आहे.
करण गायकवाड हा कला शाखेचा पदवीधर असून सध्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबात आई, एक बहीण आणि लहान भाऊ असे चार सदस्य आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने राजाबाई हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले व पुढील शिक्षण पालम (जि. परभणी) येथे पूर्ण केले. शिक्षणाच्या काळात त्याला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. 2022 मध्ये पदवीचे शिक्षण सुरू असतानाच वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला महाविद्यालयात नियमित शिक्षण घेणे शक्य झाले नाही. कुटुंबावर कर्जाचा बोजा असताना करणने केळीची घड वाहतूक करणे, केटरिंगमध्ये काम करणे, शेतीतील मजुरी अशा विविध कामांत स्वतःला झोकून दिले. आईनेही धुणी-भांडी करून संसार सांभाळत मुलांना आधार दिला. 2023 पासून करणने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर दुसर्‍याच प्रयत्नात त्याने 2025 मध्ये दिलेल्या एमपीएससीच्या वर्ग-3 परीक्षेत यश मिळवले. 1 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालात तो उत्तीर्ण झाला असून लवकरच मंत्रालय किंवा तालुका स्तरावर महसूल सहाय्यक म्हणून त्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून विविध मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रामाणिक मेहनत केली तर साथ नक्की मिळते – करण गायकवाड
माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती, पण मी कधीही त्याचा बाऊ केला नाही. उलट जबाबदारी वाढली म्हणून अधिक जोमाने कामाला लागलो. अभ्यासासाठी मला विविध सेवाभावी संस्था आणि शासकीय शिष्यवृत्तींची मदत झाली. अल्पदृष्टीमुळे मी जास्त वाचन करू शकत नव्हतो, त्यामुळे टॅबवर ऐकून अभ्यास केला. प्रामाणिक मेहनत केली तर साथ नक्की मिळते, अशी भावना करण गायकवाड याने व्यक्त केली.

COMMENTS