बीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोडदरम्यान सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा स

बीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोडदरम्यान सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियोजनाच्या अभावामुळे उडणारी प्रचंड धूळ आणि वाढलेली वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले असून तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस नेते तथा माजी नगरसेवक अमर शेख यांनी दिला आहे. याबाबत बोलताना अमर शेख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका चौक या रस्त्याच्या कामात कार्यकारी अभियंता श्री. भोपळे आणि संबंधित गुत्तेदार यांचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्त्यावर उडणार्या धुळीमुळे हॉटेल व्यवसायिक, दुकानदार आणि नागरिक हैराण झाले आहेत. संपूर्ण परिसर धुरळ्याने व्यापला असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. या सर्व परिस्थितीकडे संबंधित अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ गुत्तेदारास आवश्यक सूचना देऊन धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने काम बंद पाडत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा अमर शेख यांनी दिला आहे.

COMMENTS