मुंबई : गोरेगावमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने दोन तरूणाचा मृत्यू झाला असतांनाच दुसरीकडे मिरा-भाईंदर परिसरात अलीकडेच ‘झॉम्बी’ म्हणून ओळखल्या जाणार्य

मुंबई : गोरेगावमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने दोन तरूणाचा मृत्यू झाला असतांनाच दुसरीकडे मिरा-भाईंदर परिसरात अलीकडेच ‘झॉम्बी’ म्हणून ओळखल्या जाणार्या अंमली पदार्थाच्या प्रकरणांनी डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदार्थाच्या प्रभावाखाली येणार्या व्यक्तींचे वर्तन पूर्णतः अनियंत्रित होत असल्याचे समोर आले असून, त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील इतर काही शहरांनंतर आता मिरा-भाईंदरमध्येही अशा प्रकारच्या घटना आढळू लागल्या आहेत. भाईंदर पश्चिमेतील नव्वद फूट रस्ता परिसर तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्ती दिसून आल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर स्थानिक नागरिक, पालकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चिंतेची भावना अधिक तीव्र झाली आहे. चित्रफितीत दिसणार्या तरुणाची ओळख, त्याने नेमका कोणता पदार्थ घेतला होता आणि तो पदार्थ त्याच्यापर्यंत कसा पोहोचला, याचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या नव्या घटनांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा छडा लावून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. विशेषतः युवकवर्ग या विळख्यात अडकत असल्याची भीती व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे पदार्थ केवळ वैयक्तिक आरोग्यासाठी घातक नसून, समाजातील कायदा व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण करतात. मिरा-भाईंदरमध्ये उघडकीस आलेल्या या घटनांनी अंमली पदार्थांविरोधातील लढ्याची तीव्रता वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे. पुरवठा साखळी उध्वस्त करणे, युवकांमध्ये जनजागृती करणे आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, या तिन्ही आघाड्यांवर समन्वित प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
झॉम्बी अमली पदार्थ म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर व्यक्तीची शुद्ध हरपते आणि त्याचे वर्तन अनैसर्गिक होते. काही वेळा व्यक्ती दीर्घकाळ एकाच अवस्थेत निश्चल उभी राहते, तर काही वेळा ती अत्यंत आक्रमक हालचाली करते. या पदार्थाच्या अतिसेवनामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात; त्वचेवर जखमा निर्माण होतात आणि शरीर कुजल्यासारखे दिसू लागते. हा अमली पदार्थ मेंदू आणि मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतो, त्यामुळे व्यक्तीचे विचार आणि हालचाली यांवर नियंत्रण राहत नाही. परिणामी, स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याची शक्यता वाढते. काही प्रकरणांमध्ये जीवितहानीचाही धोका निर्माण होऊ शकतो.

COMMENTS