मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान बुधवारी पहाटे एक गंभीर अपघात घडून आला. पहाटे सुमारे च

मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान बुधवारी पहाटे एक गंभीर अपघात घडून आला. पहाटे सुमारे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महाकाय गर्डर कोसळला आणि तो उचलण्यासाठी वापरण्यात आलेली अवजड क्रेनही उलटली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या प्रकारामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या खांबावर गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. गर्डर उचलून निर्धारित ठिकाणी बसवण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने तो वर नेला जात होता. मात्र, अचानक संतुलन बिघडल्याने गर्डर कोसळला. त्याचा प्रचंड भार सहन न झाल्याने क्रेनही जागीच उलटली. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या कोसळलेला गर्डर हटवणे, उलटलेली क्रेन सरळ करणे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, या अपघाताने शहरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या कामांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असताना त्यामागील निष्काळजीपणा, देखरेखीतील त्रुटी आणि जबाबदारी निश्चिती याबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष चे प्रवक्ते आनंद दुबे यांनी राज्य सरकारवर टीका केली. बीकेसीसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या भागात घडलेली ही दुर्घटना अत्यंत गंभीर असून, कंत्राटदार आणि सल्लागारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

COMMENTS