नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांना देण्यात आलेल्या एका आठवड्याच्

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांना देण्यात आलेल्या एका आठवड्याच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाला स्थगिती दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीविषयी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खेरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात त्यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात आसाम सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणात खेरा यांना नोटीस बजावली असून, तीन आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, दिलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनाला स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, खेरा यांनी आसाममधील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांना त्यासाठी कोणताही अडथळा राहणार नाही. या आदेशामुळे त्यांच्या त्या अधिकारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र, सध्याच्या स्थितीत त्यांना अटकेपासून कोणतेही संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, खेरा यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सरमा आणि त्यांच्या पत्नी रिनिकी भुईयां सरमा यांच्याविषयी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मते, सरमा यांच्या पत्नींकडे विविध देशांचे एकापेक्षा अधिक पासपोर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. काही समर्थकांनी परदेशातून मिळविलेल्या कागदपत्रांच्या आधारे हा दावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सरमा यांनी सर्व दावे फेटाळून लावत ते द्वेषपूर्ण, बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी खेरा यांच्यावर केला आहे.

COMMENTS