मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दि

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार्या तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या भावाविरोधातच गंभीर तक्रार दाखल केल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या भावाने जाणीवपूर्वक विविध व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून बनावट चित्रफीत तयार केली. या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करण्याचा आणि समाजात बदनामी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर तसेच प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या संदर्भात मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 79 आणि 351 (1) तसेच माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कायद्यांनुसार प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासह डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. व्हिडिओ नेमका कसा तयार करण्यात आला, त्यात कोणत्या साधनांचा वापर झाला आणि तो इतक्या वेगाने कसा प्रसारित झाला, याचा सखोल तपास केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत असल्याचा कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, झिरवाळ यांनी सुरुवातीपासूनच हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा करत, वेगवेगळ्या दृश्यांची जोडणी करून तो तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असा सल्ला दिला होता. निष्पक्ष चौकशीद्वारे सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या मुंबई पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, डिजिटल पुरावे आणि तांत्रिक अहवालांच्या आधारे या प्रकरणामागील वास्तव उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या कथित व्हिडिओमागील खरे सत्य स्पष्ट होणार आहे.

COMMENTS