जळगाव : खा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्

जळगाव : खा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बोदवड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणात साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून जमीन व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना सुमारे दोन दशकांपूर्वीची असल्याचे समोर आले आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरातील गट क्रमांक 122 मधील महार वतनाची जमीन चमेलाबाई तायडे व त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्या भागात साखर कारखाना उभारण्याचे आश्वासन देत जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जमीनमालकांना चांगला मोबदला तसेच कुटुंबातील सदस्यांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तक्रारीनुसार, संबंधित व्यवहाराच्या वेळी जमीनमालकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत केवळ अल्प रक्कम आगाऊ देण्यात आली आणि कागदपत्रांवर अंगठे घेण्यात आले. त्यानंतर बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, दीर्घकाळ उलटल्यानंतरही त्या ठिकाणी कोणताही साखर कारखाना उभारण्यात आला नाही. 2025 मध्ये जमीन नोंदी तपासल्या असता ही जमीन कोणत्याही कारखान्याच्या नावावर नसून थेट शारदा खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मूळ खरेदीखताची प्रत तपासली असता त्यामध्ये नावांमध्ये खाडाखोड केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. कारखान्याच्या नावाऐवजी वैयक्तिक नाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासानंतर तक्रारदारांच्या फिर्यादीवरून एकनाथ खडसे, शारदा खडसे, व्यवहारातील मध्यस्थ तसेच संबंधित कार्यालयातील तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या व्यवहारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणातील कागदपत्रे, व्यवहाराची साखळी आणि संबंधितांची भूमिका यांची तपासणी सुरू आहे. पुढील चौकशीतून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

COMMENTS