नांदेड : नांदेड शहर अतिक्रमणमुक्त करून वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून वाघी रोड परिसरात मोठी कार

नांदेड : नांदेड शहर अतिक्रमणमुक्त करून वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून वाघी रोड परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. 4 मे रोजी अतिक्रमण हटाव पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासन अधिकच क्शन मोडमध्ये आले आणि 5 मे रोजी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमणांचा अक्षरशः सुपडा साफ करण्यात आला. यावेळी अरेरावी करणार्या जमावावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नांदेड शहर सध्या अतिक्रमणाच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे. फुटपाथवर व्यापार्यांनी कब्जा केला असून रस्त्यांवर टपर्या, फळगाड्या आणि अनधिकृत दुकाने उभारली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी काही दिवसांतच परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे दिसून येते. 4 मे रोजी मील गेट परिसर आणि वाघी रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस पथक संयुक्त कारवाईसाठी गेले असता, काही व्यावसायिक व स्थानिक नागरिकांनी अचानक विरोध करत पथकावर हल्ला चढवला. या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले असून जेसीबी चालक गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद अतिक मोहम्मद खलील, शेख आयान शेख हबीब, उमर खान सत्तार खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपालसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली 5 मे रोजी पुन्हा मोठी कारवाई राबविण्यात आली. दोन जेसीबी, अग्निशमन दल व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान पुन्हा काही जणांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी प्रथम समजावून सांगत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही जमाव न हटल्याने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, ज्यामुळे जमाव पांगला. यानंतर पथकाने रस्ता आणि फुटपाथवरील सर्व अतिक्रमणे हटवत परिसर मोकळा केला. या कारवाईमुळे वाघी रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, अतिक्रमणाविरुद्धची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. कोणत्याही प्रकारची दादागिरी किंवा अडथळा सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा उपायुक्त अजितपालसिंग संधू यांनी दिला आहे.

COMMENTS