नांदेड: नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील ’कृष्णा ट्रेडर्स’ हे इलेक्ट्रीकचे दुकान फोडून चोरी करणार्या एका टोळीचा भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने पर्दाफा

नांदेड: नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील ’कृष्णा ट्रेडर्स’ हे इलेक्ट्रीकचे दुकान फोडून चोरी करणार्या एका टोळीचा भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांना या कारवाईत एकूण 3लाख 1 हजार 700 रुपयांचा चोरीचा इलेक्ट्रीक मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून, तीन मुख्य आरोपींसह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मे 2026 रोजी पहाटे 5:30 ते 6:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कृष्णा ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून आतून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रीकचे साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी तक्रारदाराने 19 मे रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (इछड) कलम 331 (3), 331 (4) आणि 305 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ’ऑपरेशन फ्लश’ राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले होते. भाग्यनगर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख आणि त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. घटना घडली त्या दिवशी मालेगाव रोड परिसरात काही महिला, मुले आणि एक पुरुष संशयास्पद रित्या फिरत होते व ते मुदखेड भागातील भंगार वेचणारे असावेत, असा सुगावा पोलिसांना लागला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ मुदखेड येथील नंदी नगर गाठून संशयित गणेश साहेबु नक्कलवाड (वय 38) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून पंचांसमक्ष चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात त्याला साथ देणार्या वैशाली रामचंद्र नक्कलवाड (वय 20), सावित्रीबाई प्रकाश पानकोळे (वय 31) आणि इतर चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), सुरज गुरव आणि पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, विशाल माळवे, विष्णुकांत मुंडे व भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करत आहेत.

COMMENTS