Homeताज्या बातम्या

सुशिक्षित तरूणांमधील हिंसक प्रवृत्ती चिंताजनकमुख्यमंत्री फडणवीस : केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय

पुणे : लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल हत्येच्या घटनेने समाजमन हादरले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून नव्हे तर सा

अल्पवयीन मुलास मारहाण  
दरोडेखोर जगन गुर्जरची तुरुंगात हत्या
पोलिसांवरील दगडफेक भाजपच्या गुंडाकडूनअभिजीत दिपके यांचा गंभीर आरोप ; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह


पुणे : लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल हत्येच्या घटनेने समाजमन हादरले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून नव्हे तर सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही पाहण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबांतील तरुणांमध्ये सूड, द्वेष आणि हिंसक प्रवृत्ती का वाढत आहेत, याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेला अत्यंत दुर्दैवी आणि अनाकलनीय संबोधत समाजातील मूल्यव्यवस्था, कौटुंबिक संवाद आणि मानसिक आरोग्य यांबाबत व्यापक चर्चा घडून येण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलिस तपासानुसार, पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा मृत्यू लोहगड परिसरात संशयास्पद परिस्थितीत झाला. या प्रकरणात त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा परिचित चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात दूरध्वनी संपर्क झाल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबींचा तपशीलवार तपास सुरू असून, पोलिस विविध पुरावे आणि साक्षींच्या आधारे सत्य परिस्थिती उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणावरही मुख्यमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे अत्यंत क्रूर आणि दुर्मिळ स्वरूपाचे अपराध असल्याचे सांगत, दोषी व्यक्तीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले असून, शिक्षेबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. अशा गुन्ह्यांविरोधात समाजात भीती आणि कायद्याचा प्रभाव निर्माण होण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध
लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्या प्रकरणी, त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबीयांचे सांत्वन करत, त्यांना न्याय देण्यासाठी सरकारकडून कोणतीही कसूर सोडली जाणार नाही आणि या प्रकरणातील दोषींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, असे भक्कम आश्‍वासन दिले. अग्रवाल कुटुंबीयांनी या खटल्यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आहे.

COMMENTS