भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी या बाजारपेठेच्या गावातील नेहमीच वर्दळीच्या असलेल्या बसस्थानक चौकातील जामगाव रस्ता ते नगर रस्ता बायपास (एस.के.

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी या बाजारपेठेच्या गावातील नेहमीच वर्दळीच्या असलेल्या बसस्थानक चौकातील जामगाव रस्ता ते नगर रस्ता बायपास (एस.के. चौक) या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील स्थानिक कार्यकर्ते अशोक रोहोकले यांनी निवेदन देऊन खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पारनेरचे अभियंता यांचे लक्ष वेधले होते.
या संदर्भात पाठपुरावा करुनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने प्रशासनाच्या विरोधात अशोक रोहोकले व गावातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्यात बसून आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नियोजित कार्यक्रमासाठी भाळवणी मार्गे पारनेरला जात असताना यांनाही आंदोलकांनी थांबवून निवेदन देत रस्ता दुरुस्तीची मागणी केली. खा. निलेश लंके आंदोलन स्थळी आल्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी पाऊस संपताच संबंधित रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. या खराब रस्त्याच्या दुरुस्ती बाबत ‘एनएचएआय’ च्या अहिल्यानगर संचालकांशी पत्रव्यवहार व भ्रमणध्वनी वरुन चर्चा झाली असल्याचे पारनेरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुबोध वसईकर यांनी सांगितले.

COMMENTS