Homeताज्या बातम्या

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता

राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
प्रवरेच्या कृषिदूतांचे चंद्रापूर येथे स्वागत


देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता घटत आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या वापराबरोबरच जैविक व सेंद्रिय खतांचा समावेश करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती (खरीप २०२६) बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते. ही बैठक ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पार पडली.
यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील तसेच कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवडी हे ऑनलाइन उपस्थित होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, डॉ. साताप्पा खरबडे आणि कृषी तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. खर्चे यांनी सांगितले की, येत्या खरीप हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास आपत्कालीन पीक नियोजनासाठी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेली ‘आपत्कालीन पीक नियोजन’ पुस्तिका विस्तार यंत्रणा व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन देण्याची गरज असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी (कोल्हापूर), सुभाष काटकर (नाशिक) आणि बाबासाहेब जेजुरकर (पुणे) यांनी विभागनिहाय खरीप हंगामाचा आढावा व विद्यापीठ शिफारशींवरील प्रत्याभरण सादर केले.
यावेळी विविध विषयांवर तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. उत्तम कदम यांनी खरीप पिकांचे कीड व्यवस्थापन, डॉ. सुरेश दोडके यांनी कडधान्य पीक उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. श्रद्धा बगाडे यांनी हवामान आधारित नियोजन, डॉ. पवन कुलवाल यांनी कापूस उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. उल्हास सुर्वे यांनी नैसर्गिक शेती, डॉ. सुदर्शन लटके यांनी रोग व्यवस्थापन व ‘फुले सुपर बायोमिक्स’ या नाविन्यपूर्ण उत्पादनाची माहिती दिली.
 बैठकीदरम्यान मान्यवरांच्या हस्ते ‘आपत्कालीन पीक नियोजन’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय शेलार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार  डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.

COMMENTS