Homeताज्या बातम्या

संरक्षक कठडा नसलेल्या सार्वजनिक विहिरीने घेतला 11 वर्षीय बालकाचा बळी; माहूर तालुक्यातील लसनवाडी येथील धक्कादायक घटना

माहूर : सार्वजनिक वापरातील विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने एका 11 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील लसनवाड

यशवंत माध्यमिक विद्यालय कुर्ला येथे ’पोक्सो कायदा व बालहक्क’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
यूपीएससी मध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश; ना. पंकजाताई मुंडे यांनी केले गाढे पिंपळगावच्या भूमिपुत्राचे अभिनंदन
पालघर जिल्ह्यात संतापजनक घटना! तलासरी येथे १९ वर्षीय तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक अत्याचार; तीन आरोपींना काही तासांत अटक
NANDED: प्लॅस्टिक बॉलमुळे गेला 11 वर्षीय चिमुकल्याचा जीव, 9 तास बचावकार्य  अन् आईनं हंबरडा फोडला | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

माहूर : सार्वजनिक वापरातील विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने एका 11 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील लसनवाडी येथे 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. हनुमान मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पडल्याने समर्थ विकास राठोड या बालकाचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेने राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण लसनवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास काही लहान मुलांनी समर्थ हा हनुमान मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पडल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. ही माहिती मिळताच समर्थचे वडील विकास खंडू राठोड यांच्यासह कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यावर समर्थची चप्पल तरंगताना दिसून आली. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. विहिरीतील पाणी मोटारपंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने संपूर्ण पाणी काढणे शक्य झाले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता समर्थ पाण्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने विहिरीबाहेर काढून माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी तपासणी केल्यानंतर समर्थला मृत घोषित केले. घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांनंतर रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास समर्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. 9 ऑगस्ट रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अवघ्या 11 वर्षांच्या समर्थच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, त्याच्या निधनाने गावातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हनुमान मंदिर परिसरातील ही विहीर सार्वजनिक वापरातील असूनही तिच्याभोवती आवश्यक असा संरक्षक कठडा अथवा सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विहीर उघडी असल्याने लहान मुले तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एका निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनाने या विहिरीची तातडीने पाहणी करून संरक्षक कठडा उभारावा, विहिरीभोवती सुरक्षा व्यवस्था करावी आणि धोकादायक सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ‘दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच खबरदारी घेणे गरजेचे आहे,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS