पालघर : राज्यातील महिलांवरील, तरुणींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे सरकार महिलांवरील अत्याचाराच्या बाबती

पालघर : राज्यातील महिलांवरील, तरुणींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे सरकार महिलांवरील अत्याचाराच्या बाबती गंभीर असून पोलिसांनाही तातडीने कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता, सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पालघर जिल्ह्यातील तलासरी हादरलं आहे. आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संतापजनक घटनेनं पालघर जिल्हा हादरला आहे.
पालघरच्या तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. मित्रासोबत महामार्गावर उभं असताना दोन बाईकवरून आलेल्या सहा जणांनी एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात नेत 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी, तलासरी पोलीस ठाण्यात सहा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल असून तीन आरोपींना अवघ्या काही तासातच अटक करण्यात आली आहे. तर, इतर तीन फरार असून आरोपींचा शोध सुरू आहे. 19 वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दिली की, ती तरुणी तिच्या मित्रासह दुचाकीवरुन फिरायला गेली होती, दरम्यान खामगाव येथे त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने ते खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन इसमांनी तरुणीच्या मित्राला दमदाटी करुन हाकलून लावले. त्यानंतर, दुचाकीवरील तिघांनी आणखी तीन जणांना बोलावून घेतले. तसेच, पीडित तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खामगावजवळील एका बंद डाक बंगल्यावर नेले, या बंगल्याच्या कट्ट्यावर सहा जणांकडून तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, अशी फिर्याद तलासरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी देखील तत्परतेनं तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच, त्यांच्यावर बीएनएस 70/1 नुसार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षकांनीही भेट दिली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तलासरी पोलीस निरीक्षक अजय गरुड यांनी दिली.

COMMENTS