नांदेड : नांदेड महानगरपालिकेत सत्तेच्या समीकरणासाठी एकत्र आलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन राजकीय घटक आता शहरातील प्रस्


नांदेड : नांदेड महानगरपालिकेत सत्तेच्या समीकरणासाठी एकत्र आलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन राजकीय घटक आता शहरातील प्रस्तावित 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या श्रेयावरून मात्र कट्टर विरोधक बनल्याचे चित्र दिसत आहे. सत्तेच्या पातळीवर युतीधर्म जपणारे नेते विकासकामांच्या श्रेयासाठी एकमेकांसमोर उभे ठाकल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रस्तावित 33 केव्ही उपकेंद्राचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. प्रत्यक्षात हे उपकेंद्र अद्याप कागदोपत्री प्रक्रियेत असताना त्याच्या उभारणीचे श्रेय घेण्यासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. एकीकडे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी या कामासाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे महापौर कविता मुळे यांच्या स्तरावरही या कामासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शहरात वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असताना वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. अनेक भागांत तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी एक ते दोन दिवस वीज गायब असल्याचीही नागरिकांची नाराजी आहे. नागरिकांचा रोष व्यक्त करताना अनेकांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे की, श्रेय कोणीही घ्या, पण आधी शहराचा वीजपुरवठा सुरळीत करा. विकासकामांपेक्षा श्रेयवादाला प्राधान्य दिले जात असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमा जोरात राबविल्या जात असताना उन्हाळ्यात अखंडित वीजपुरवठा राखण्यात मात्र अपयश येत असल्याचा आरोप केला जात आहे. वीजबिल थकबाकीवर तत्काळ कारवाई होते, मात्र दीर्घकाळ खंडित वीजपुरवठ्यावर तितक्याच तत्परतेने उपाययोजना होत नसल्याने संताप वाढत आहे. राजकीय नेत्यांमधील श्रेयवाद आणि परस्पर आरोप-प्रत्यारोप यापेक्षा शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. 33 केव्ही उपकेंद्र प्रत्यक्षात उभे राहून नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत श्रेयाच्या घोषणांना फारसे महत्त्व नसल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

COMMENTS