नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी नांदेड दौर्यात केले. जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला गती देण्यासाठी शासन सकारात्मक असून मुखेड येथे नवीन एमआयडीसीसाठी अधिसूचना काढून मंजुरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.
नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सामंत म्हणाले की, मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. नांदेड जिल्ह्याला भौगोलिक, कृषी आणि व्यापारी दृष्ट्या मोठी क्षमता लाभली आहे. या क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहती, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. मुखेड येथे एमआयडीसी मंजूर झाल्याने परिसरातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. ते पुढे म्हणाले की, विकासकामांना पक्षीय चष्म्यातून पाहणे योग्य नाही. उद्योग, रस्ते, विमानतळ, महामार्ग आणि गुंतवणूक यांसारखे विषय हे जनतेच्या भवितव्याशी संबंधित आहेत. त्यामुळे नांदेडच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे. कोणत्याही प्रकल्पावर अनावश्यक राजकारण करून जिल्ह्याचे नुकसान होऊ देऊ नये. महाराष्ट्रातील टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरही त्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात व्यवसाय करणार्या आणि वास्तव्यास असलेल्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. मराठी ही केवळ भाषा नसून राज्याची अस्मिता असल्याने या निर्णयाचे विनाकारण राजकारण करू नये, असेही त्यांनी सांगितले. इतिहास आणि स्वाभिमानाच्या प्रश्नावर बोलताना सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानास्पद वक्तव्य करणार्यांना शिवसेना कधीही माफ करणार नाही, असा इशारा दिला. नांदेड विमानतळाच्या विकासाबाबत खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शक्तीपीठ महामार्गाबाबत जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करून विकासकामांना गती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योगमंत्र्यांच्या या दौर्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित औद्योगिक प्रश्नांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुखेड एमआयडीसीची मंजुरी हा जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

COMMENTS