बीड : दि. 05 एप्रिल 2026 रोजी चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील उमापूर येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आरोपी व

बीड : दि. 05 एप्रिल 2026 रोजी चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील उमापूर येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आरोपी विजय महादेव कळे (रा. पळशी, ता. मुदखेड, जि. नांदेड, सध्या रा. उमापूर, ता. गेवराई) याच्याविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. 102/2026, कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात आरोपीसह दोन्ही अल्पवयीन मुलींचा शोध घेणे हे चकलांबा पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. प्राथमिक तपासात आरोपी पूर्वी भिवंडी (जि. ठाणे) येथे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी भिवंडी येथे जाऊन आरोपीच्या जुन्या राहत्या ठिकाणी शोध घेतला, मात्र तेथे आरोपी व मुली मिळून आल्या नाहीत. तांत्रिक तपासाच्या मदतीने संबंधित मुली बिहार-उत्तर प्रदेश सीमाभागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चकलांबा पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक तात्काळ उत्तर प्रदेशकडे रवाना झाले. तपास पथकाने उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवपूर दियार येथे शोधमोहीम राबवली. तेथून आरोपी व मुली सिकंदरपूर (जि. बलिया) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. या कारवाईत आरोपी विजय कळे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलींचीही सुखरूप सुटका करण्यात आली. माहितीनुसार आरोपी मुलींना घेऊन काही दिवसांत छत्तीसगड राज्यात जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच चकलांबा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीसह मुलींना ताब्यात घेतले. ही कारवाई सलग चार दिवसांच्या पाठपुराव्यानंतर यशस्वी करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पो.ह.क. कल्याण पवार, पोलीस अंमलदार हनुमान इंगोले तसेच टेक्निकल अॅनालिसिस सेलचे पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे व पोलीस अंमलदार विकी सुरवसे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

COMMENTS