Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज्याचा अग्रक्रम राखणे लोकांच्याच हातात !

भारतीय स्वातत्र्याने आपली पंचाहत्तरी साजरी केली, तर, भारतीय लोकशाही आता पंचाहत्तरीत प्रवेश करणार आहे. अशा काळात लोक अधिक सुज्ञ आणि आपल्या स्वातंत

काॅंग्रेस सोबतचे शीतयुद्ध…! 
दहा कोटी भारतीयांकडे अर्थव्यवस्थेला धोकादायक असणारी क्रिप्टोकरन्सी!
महायुती काॅंग्रेसमय ! 

भारतीय स्वातत्र्याने आपली पंचाहत्तरी साजरी केली, तर, भारतीय लोकशाही आता पंचाहत्तरीत प्रवेश करणार आहे. अशा काळात लोक अधिक सुज्ञ आणि आपल्या स्वातंत्र्य आणि अधिकाराप्रति सजग करण्याऐवजी प्रत्येक सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकांना गृहीत धरून राजकारण करण्यास अधिक प्राधान्य देत असल्याचे आपणांस सध्या तरी दिसत आहे. विशेषत: हा प्रकार महाराष्ट्रात अधिक प्रकर्षाने दिसत आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूका संपन्न झाल्यानंतर राज्यात धक्कातंत्र देत थेट महाविकास आघाडी बनवून ज्यात प्रथमच शिवसेना हा पक्ष काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत आला होता. मात्र, या आघाडीला सत्तेचा भाग असणाऱ्या शिवसेनेच्या तत्कालीन मंत्री आणि आमदारांनी तर महाधक्कातंत्र अवलंबित सत्ता बदल घडवला. मात्र, त्या क्षणापासून आता त्या घटनेला एक वर्ष होवून गेल्यानंतरही राज्यातील सर्वच पक्ष – ज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही गटांचा समावेश होतो, त्यांनी लोकांना गृहीत धरून केवळ गद्दार दिन, देशद्रोही दिन, आज हे अमुक पक्षात जाणार आणि उद्या ते तमुक पक्षात जाणार; एवढ्याच भोवती सत्ता आणि राजकारणाचे केंद्रीकरण केले आहे. भारतीय राज्य व्यवस्था ही संविधानाबरहुकूम चालणे नुसते अपेक्षित नाही, तर, संविधानाचे अस्तित्व असेपर्यंत ते सक्तीचे आहे. त्या अर्थाने संविधानाने नमुद केल्यानुसार कोणत्याही शासन व्यवस्थेला लोकांना जवाबदेही रहावे लागते! शासन तसे करित नसेल तर विरोधी पक्षांनी त्यासाठी शासन संस्थेला बाध्य करावे लागते. यातून लोकांचे अधिकार आणि कर्तव्य विस्तारत जाऊन त्यात आधुनिक जीवन मूल्यांनुसार सुधारणा देखील होत जाते. लोकशाही आपल्या देशात संविधानाच्या माध्यमातून आल्याने लोकांनाही त्याचे महत्व वाटेनासे झालेले दिसते. अशा लोकांना हुकूमशाही, लष्करशाही, सैन्यशाही असणाऱ्या असंख्य देशातील जनतेचे जीवनमान समोर ठेवायला हवे. हे सारे करणारे प्रसारमाध्यमे देखील आज बटीक झालेली दिसतात! अशावेळी , विरोधी पक्षांनी तरी लोकांच्या हितासाठी काम करण्याची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा करावी लागते. परंतु, आमच्याकडे सत्ताधारी आणि विरोधक एकाच साखळीचे धनी होऊ पाहत आहेत. याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात सध्या पहायला मिळत आहे. पक्ष कोणताही असो ते लोकाभिमुख भूमिका न घेता एकमेंकांची उणीदूणी काढत प्रसारमाध्यमांना रसद पुरवत आहेत. राजकरण हे केवळ मनोरंजनाचे साधन बनवून सत्ता-सत्ता खेळण्याचा प्रकार सर्वपक्षीयांनी चालविला असल्याने, या प्रक्रियेत लोकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे, लोकशाहीत लोकांना आपल्या हक्क अधिकाराप्रति सजग करण्याचे कार्य आपल्यासारख्या राजकियेतर लोकांनाच करावे लागेल, असेच अलीकडच्या काळात घडविल्या जात असलेल्या घटनांवरून म्हणावे लागेल. महाराष्ट्र हा बौध्दिक पातळीवर देशाचे नेतृत्व करित आला आहे. त्यामुळे, समाजकारण, अर्थकारण, औद्योगिकीकरण, कायदा – सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य या सर्व बाबींत देशात अग्रणी असणारा महाराष्ट्र खाईत लोटण्याचे काम सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मिळून करित आहेत. त्यामुळे, महाराष्ट्राची असणारी शान या काळात अक्षरशः लयाला जाताना दिसत आहे. लोक आपल्या हातात काही नाही, असं समजून हतबल होत आहेत. परंतु, आम्ही महाराष्ट्राच्या नागरिकांना ठासून सांगतो की, राज्याचे खरे मालक तुम्ही आहात. सत्ताधारी आणि विरोधक हे तुमच्या मताचे मूल्य घेऊन या स्थानावर आले आहेत. त्यामुळे, मताचे मूल्य आता लोकांनी अधिक जाणीवपूर्वक समजून घ्यायला हवे. कारण, आपला म्हणजे आपल्या राज्याचा अग्रक्रम हा आपल्या हातात आहे. या सर्व सुंदोपसुंदी चे राजकारण करणाऱ्यांना आता निक्षून सांगण्याची वेळ आली आहे की, आमच्या मत मूल्याची प्रतारणा आता यापुढे सहन केली जाणार नाही!

COMMENTS