बीड : रस्त्यावर गुंडगिरी करून दहशत माजविणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांना धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी गुन्

बीड : रस्त्यावर गुंडगिरी करून दहशत माजविणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांना धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत अटक केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या व सर्वसामान्यांना नाहक त्रास देणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास बंब सर्कल, नगर नाका येथील बालाजी नाष्टा सेंटरमध्ये फिर्यादी दिलीप साहेबराव वायभट (वय ३८) हे काम करत होते. यावेळी आरोपी स्वप्नील भाऊसाहेब शिंदे (वय ३४, रा. श्रीरामनगर) आणि आदेश भगवान जोगदंड (वय २४, रा. जायकवाडी कॉलनी) हे कार क्रमांक एमएच-२३-एयू-६९८८ मधून तेथे आले. आरोपींनी नाश्त्याचे पैसे न देता उलट दारू पिण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ करून बिअरची बाटली, लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
गुप्त माहितीवरून सापळा रचून अटक घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी गु.र.नं. २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सापळा रचला. दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कार, लोखंडी रॉड आणि लाकडी काठी जप्त करण्यात आली आहे.
आदेश जोगदंडवर यापूर्वी चार गंभीर गुन्हे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आदेश जोगदंड याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, अस्त्रास्त्र कायदा तसेच इतर गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रस्त्यावर गुंडगिरी करून नागरिकांना वेठीस धरणार्या कोणत्याही प्रवृत्तीची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच अशा गुंडांपासून न घाबरता नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, सहायक पोलीस अधीक्षक श्री. व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर मराडे, पोलीस शिपाई अनिल आसेवार, अनिल घटमाळ आणि नवनाथ डाके यांच्या पथकाने आरोपींना अटक करण्याची कारवाई केली.

COMMENTS