अहिल्यानगर : कोपरगाव शहरात रविवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. हाता

अहिल्यानगर : कोपरगाव शहरात रविवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. हातात धारदार शस्त्रे आणि लाकडी दांडके घेऊन फिरणाऱ्या या टोळक्यामुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, रात्री ११ ते पहाटे १ वाजेच्या दरम्यान शहरातील विविध भागांसह धारणगाव रस्ता परिसरात संबंधित टोळक्याने गोंधळ घातला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला करून त्यांची तोडफोड करण्यात आली. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांसह विशेषतः धारणगाव रोड परिसरात या तरुणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर या टोळक्याने थेट हल्ला चढवला. धारदार हत्यारे आणि दांडक्यांनी वाहनांच्या काचा फोडत, वाहनांचे मोठे नुकसान केले. रात्रीच्या शांततेत अचानक सुरू झालेली दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि आरडाओरड्यामुळे घरात शांत झोपलेले नागरिक आणि महिला भयभीत होऊन जागे झाले. परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. मावा दिला नाही म्हणून हा वाद सुरू झाला असल्याचे बोलले जात असले तरी मात्र अधिकृत माहिती पोलीस दरबारी नोंद झाल्यानंतर समोर येणार आहे.
नेमका हा वाद कशामुळे झाला आणि शांत कोपरगावात मध्यरात्री हा हैदोस का घालण्यात आला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, सकाळपर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. त्यामुळे दहशत माजवणारे हे कोण होते? हे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, मध्यरात्री इतक्या मोठ्या संख्येने तरुण हातात उघडी हत्यारे घेऊन फिरतात आणि धुमाकूळ घालतात, यामुळे गुंडांवर कुणाचा धाक उरला आहे की नाही?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस प्रशासनाने या गुंडगिरीची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकाव्यात आणि त्यांना कठोर अद्दल घडवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

COMMENTS