देवळाली प्रवरा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्धापनदिनानिमित्त धानोरे घाटावरील शिवतीर्थावर रविवारी स्वराज्याचा दिमाखदार जागर करण्या

देवळाली प्रवरा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्धापनदिनानिमित्त धानोरे घाटावरील शिवतीर्थावर रविवारी स्वराज्याचा दिमाखदार जागर करण्यात आला. भगव्या पताकांनी सजलेला परिसर, ‘जय शिवराय’च्या गर्जना आणि शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
धनेश्वर देवस्थान परिसरातील शिवतीर्थावर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा विधिवत अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विलास इंद्रभान शिंदे व बाबासाहेब पाराजी दिघे यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला. दिवसभर शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
सायंकाळी महाआरती व आकर्षक आतिषबाजीने वातावरण भक्तिमय झाले. यानंतर व्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रदर्शन, स्वराज्याची लोककल्याणकारी संकल्पना, सामाजिक समता आणि युवकांची जबाबदारी या विषयांवर ओजस्वी मार्गदर्शन केले. “स्वराज्य ही जनतेच्या सन्मानाची आणि आत्मविश्वासाची चळवळ आहे,” असे प्रतिपादन करत त्यांनी युवकांना शिवचरित्रातून नेतृत्व व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर आयोजित आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान ट्रस्ट, शिवतीर्थ व्यवस्थापन समिती, युवक मंडळे व ग्रामस्थांनी केले.
यावेळी प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. पोपट पंडित दिघे, बळवंत दिघे, मच्छिंद्र दिघे, विलास शिंदे, सुनील ताजने, जिजाबापू प्रधान, अण्णासाहेब दिघे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, महिला भगिनी, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS