बीड : अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रूपाली जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात

बीड : अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रूपाली जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण राजेंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
रूपाली देशपांडे या गेल्या काही काळापासून सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेऊन अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर रूपाली देशपांडे यांनी संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे, सामाजिक ऐक्य वाढविणे, विविध सेवा उपक्रम राबविणे तसेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात महिला आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच महिलांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे, त्यांच्या समस्या आणि प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रूपाली जयंत देशपांडे यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS