Homeताज्या बातम्यापुणे

मेफेड्रोन कारखाना उभारण्याच्या तयारीतील तिघे अटकेतकुरकुंभ प्रकरणातील आरोपीकडून मार्गदर्शन घेतल्याचा दावा

पुणे : मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणा

गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात


पुणे : मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणातील जामिनावर असलेल्या आरोपीची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून सुमारे 45 लाख रुपयांचे मेफेड्रोन, महागड्या मोटारी आणि इतर साहित्य असा एकूण एक कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाघोली परिसरातील मेफेड्रोन विक्री प्रकरणाच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी अनिस शम्मू सय्यद, हरी उत्तम उफाडे, सुमीत अशोक घुले, प्रतीक उर्फ सोन्याबापू होले आणि ऋषीकेश अंकुश यनभर यांना केसनंद परिसरातून अटक केली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाचा विस्तार करण्यात आला. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सखोल तपासात आरोपींकडून वाघोली, केसनंद, लोणीकंद तसेच शिरूर तालुक्यात मेफेड्रोनची विक्री होत असल्याचे समोर आले. तपासात सुमीत घुले याला आकाश अशोक ढवळे याने मेफेड्रोन विक्रीसाठी पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आकाश ढवळे आणि रामनिवास रानूराम बिष्णोई यांना अटक केली.
तपासादरम्यान ढवळे आणि बिष्णोई हे मुंबईतील विपिनकुमार श्रीरामसागर पंडित यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. पंडित याच्यावर यापूर्वी कुरकुंभ औद्योगिक परिसरातील मोठ्या मेफेड्रोन प्रकरणात कारवाई झाली होती. त्या वेळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणात अटक झाल्यानंतर पंडित सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ढवळे, बिष्णोई आणि पंडित हे तिघे मिळून नव्याने मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत होते. अमली पदार्थ निर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक मदत आणि मार्गदर्शन पंडित देणार असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS