संगमनेर: पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भोळ्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी अलनिनोचा धोका टळून चांगला पाऊ

संगमनेर: पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भोळ्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी अलनिनोचा धोका टळून चांगला पाऊस झाला आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. ईश्वरकृपेने राज्यातील सर्व नागरिक सुखी, समाधानी आणि आनंदी होऊ दे, अशी प्रार्थना करताना आषाढी वारी हा अध्यात्माचा सोहळा समतेचा आणि एकतेचा असून जगासाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेरमधील चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत-महंतांचा समतेचा आणि मानवतेचा विचार वारकरी संप्रदायाने पुढे नेला आहे. यामध्ये लहान-थोर असा कोणताही भेदभाव नसतो. लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने भक्तीभावाने वारी पूर्ण करतात. हा एकतेचा सोहळा संपूर्ण जगासाठी दिशादर्शक आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, यंदा अलनिनोमुळे दुष्काळाची मोठी भीती होती. मात्र पांडुरंगाच्या कृपेने जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, आढळ आणि भोजापूर ही सर्व धरणे भरली असून ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. संगमनेर शहरात विविध शाळा व महाविद्यालयांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी दिंड्या काढल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.

COMMENTS