मुंबई: नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशातील असंख्य विद्यार

मुंबई: नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशातील असंख्य विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवरून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभरात पेटलं असून, मुंबईतही ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुमित राघवन, अमेय वाघ, प्राजक्ता माळी आणि वनिता खरात यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित व व्हिडिओंमधून विद्यार्थ्यांच्या बाजूने ठाम आवाज उठवला आहे.
काय म्हणाला सुमित राघवन?

“प्रश्न विचारू नका. जे चाललंय ते ठीक चाललंय. प्रश्न विचारल्याने देशाचा अपमान होतो. महाराष्ट्रात तर तुम्ही पाहिलंच असेल की सवाल केला तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग भले कोणी लोकप्रतिनिधी आणि त्याचे गुंड मिळून डॉक्टरांना निर्दयपणे मारू दे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले तरी महाराष्ट्राचा अपमान होत नाही ना? पूल कोसळत आहेत, २००५ मध्ये पूर आला होता आणि आज २०२६ मध्ये २१ वर्षांनंतरही परिस्थिती तशीच आहे. नालासोपारा, वसई-विरार भागात तीन-तीन दिवस वीज नसते, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही. पण प्रश्न विचारला तर लाठ्यांचा मार मिळतो. याला लोकशाही म्हणायचं की हुकूमशाही?” असा खरमरीत सवाल सुमित राघवनने केला आहे. पुढे बोलताना तो म्हणाला, “त्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे? हे इतकं कठीण आहे का? त्या मुलांना कसं मारलं गेलंय? हीच मुलं या देशाचे भविष्य आहेत. कृपया खुर्च्यांवरून उठा, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांचा विश्वास जिंका. मी त्या आंदोलक मुला-मुलींना सलाम करतो.”
संवाद साधा आणि शांती निवडा: प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी व्यक्त होताना म्हणाली, “आतापर्यंत मी दोन गोष्टींवर विश्वास ठेवलाय.. संवाद आणि शांती. कोणताही वाद निष्पक्ष चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्ती शांततापूर्ण वातावरणासाठी पात्र असतो. संवाद साधा आणि शांती निवडा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेदनेसाठी माझं मन दुखावतंय.”
वनिता खरातने आंदोलनात दाखवलं संविधान

मुंबईतील आंदोलनात थेट सहभागी होत अभिनेत्री वनिता खरातने लिहिले, “काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या, प्रश्न विचारा, न्यायाची साथ द्या.”

COMMENTS