श्रीगोंदा: संत-महंतांची पावन भूमी म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंदा नगरीतील सिद्धेश्वर घाट येथे दशक्रिया विधी करण्याची धार्मिक परंपरा आजही जपली जात आ
श्रीगोंदा: संत-महंतांची पावन भूमी म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंदा नगरीतील सिद्धेश्वर घाट येथे दशक्रिया विधी करण्याची धार्मिक परंपरा आजही जपली जात आहे. श्रीगोंद्याला ‘धाकटी पंढरी’ म्हणूनही ओळखले जात असून, या पवित्र भूमीत दशक्रिया विधीदरम्यान काकस्पर्श होत असल्याची श्रद्धा अनेक भाविकांमध्ये आहे. मात्र, काही नागरिकांच्या मनातील शंका-कुशंकांमुळे अनेक कुटुंबे दशक्रिया विधीसाठी इतर ठिकाणांची निवड करतात. याबाबत काकस्पर्श समितीने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे.
समितीच्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांत श्री. स्वप्निल चव्हाण, भरत अण्णा शेलार आणि नारायण काळे यांच्या दशक्रिया विधी श्रीगोंदा येथील सिद्धेश्वर घाटावर पार पडले. या तिन्ही विधींमध्ये श्रद्धेनुसार काकस्पर्श झाल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे श्रीगोंदा येथील सिद्धेश्वर घाटाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होत असल्याचा दावा समितीने केला आहे.
श्रीगोंदा नगरीला संतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. येथे असलेल्या विविध प्राचीन देवस्थानांमुळे आणि धार्मिक परंपरांमुळे या भूमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिद्धेश्वर घाटावर अनेक वर्षांपासून दशक्रिया विधी होत असून, पंचक्रोशीतील अनेक कुटुंबे येथे येऊन आपल्या पूर्वजांचे धार्मिक विधी पार पाडतात.
यावेळी काकस्पर्श समितीने श्रीगोंदा व पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मनातील गैरसमज व शंका दूर करून या पुण्यवान आणि पावन भूमीतच आपल्या आप्तस्वकीयांचे दशक्रिया विधी करावेत. धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही समितीने नमूद केले.
दरम्यान, या आवाहनानंतर श्रीगोंदा सिद्धेश्वर घाटावरील दशक्रिया विधींच्या धार्मिक परंपरेबाबत पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, भाविकांनी या पवित्र स्थळाच्या महत्त्वाचा विचार करून स्थानिक धार्मिक परंपरांना प्राधान्य द्यावे, असे मत अनेक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

COMMENTS