बीड : वैशाख शुक्ल सप्तमी व गंगा उत्पत्ती दिनाच्या पावन मुहूर्तावर गुरुवार, दि. 23 एप्रिल रोजी शहरातील सहयोगनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात ‘श

बीड : वैशाख शुक्ल सप्तमी व गंगा उत्पत्ती दिनाच्या पावन मुहूर्तावर गुरुवार, दि. 23 एप्रिल रोजी शहरातील सहयोगनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात ‘श्रीमहादेव-श्रीनंदी’ यांसह ‘हरीहर शिवलिंग’चा भव्य चलप्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
विशेष म्हणजे या शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप दर्शनास येत असल्याने भाविकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले होते. पहाटे 5.30 वाजल्यापासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. श्रीगणेश, श्रीविठ्ठल-रुख्मिणी, श्रीगजानन महाराज, श्रीगुरुदेव दत्त आणि श्रीराम पंचायतन दैवतांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत ‘हरीहर शिवलिंग’वर वेदमंत्रांच्या गजरात रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यास सहयोगनगर व परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन सांस्कृतिक मंडळ, सहयोगनगर, बीड यांच्या वतीने सुयोग्य नियोजनासह करण्यात आले.

COMMENTS