Homeताज्या बातम्याअहमदनगर

आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार

भगवान महावीर जयंतीनिमित्त आष्टी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने मानवतेचा जिवंत आदर्श साकारत समाजासमोर एक प्रेरणादायी संदेश ठेवला. मनुष्

‘शताब्दी दीपस्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्काराने अमोलक संस्था सन्मानित;सरपंच परिषदेकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; आष्टी तालुक्यातील हृदयद्रावक घटना
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी 90 कोटींचा निधी मंजूर; खा.बजरंग सोनवणेंनी मानले आभार, 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचा होणार कायापालट



भगवान महावीर जयंतीनिमित्त आष्टी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने मानवतेचा जिवंत आदर्श साकारत समाजासमोर एक प्रेरणादायी संदेश ठेवला. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा या विचारांचा प्रत्यय देत साध्या आणि साधेपणाने पार पडलेल्या विवाह सोहळ्यातून चार दिव्यांग निराधारांना दत्तक घेण्याचा हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाने उपस्थितांच्या मनात भावनिक ठसा उमटवला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांचे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या विषयावरील प्रभावी व्याख्यान. आपल्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक शैलीत त्यांनी जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. मानवी जन्म अनमोल आहे, मात्र भौतिकतेच्या गर्दीत आजचा माणूस खरे जगणे विसरत चालला आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना आत्मचिंतनाचा नवा दृष्टिकोन दिला. महाजन यांनी जीवनाचे सार सांगताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगण्याची सवय लावावी, आनंद बाहेर नसून तो आपल्या अंतर्मनात शोधावा, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे हीच खरी प्रगती असून आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कसे जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यशस्वी आणि समाधानकारक जीवनासाठी स्वतःवर प्रेम करणे, इतरांना मदतीचा हात देणे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणे ही तीन सूत्रे त्यांनी अधोरेखित केली. समाजात वाढत चाललेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संवाद, सकारात्मक विचार आणि परस्पर सहकार्य यांचे महत्त्वही त्यांनी विशद केले. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांना अंतर्मुख करत जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त केले. कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी दीपस्तंभ फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, अनाथ, दिव्यांग, तृतीयपंथी आणि वंचित घटकांसाठी संस्था करत असलेले कार्य समाजासाठी दीपगृहासारखे आहे. साध्या विवाहातून चार निराधारांना दत्तक घेण्याचा उपक्रम हा खर्‍या अर्थाने मानवतेचा जिवंत आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांना ‘महावीर रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते झालेल्या या सन्मानामुळे सामाजिक बांधिलकी जपणार्‍या पत्रकारितेचा गौरव अधिक उंचावला. कार्यक्रमास माजी आमदार साहेबराव दरेकर, सुखलाल मुथा, जिया बेग, शैलेश सहस्त्रबुद्धे, रंगनाथ धोंडे, विजयशेठ मेहेर, संजयशेठ मेहेर, अतुलशेठ मेहेर, राहुल मुथा, रवीशेठ मेहेर, आदिनाथ सानप, किशोर हंबर्डे, वाल्मिक निकाळजे, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, दत्ता काकडे, उत्तम बोडखे, बाळासाहेब मेहेर, महेश सावंत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार बांधवांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, उत्तम बोडखे, दत्ताभाऊ काकडे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, शरद रेडेकर, गणेश दळवी, प्रवीण पोकळे, सचिन रानडे तसेच लोकशाही पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ‘जागतिक लोकवार्ता’चे संपादक अण्णासाहेब साबळे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बोगावत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांनी खुमासदार शैलीत केले, तर आभार प्रदर्शनही विजय बोगावत यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमातून मानवतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आणि दुसर्‍याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हेच खरे यश हा संदेश ठळकपणे अधोरेखित झाला. आष्टीत साकारलेला हा मानवतेचा दीप अनेकांच्या जीवनात प्रेरणेचा प्रकाश निर्माण करणारा ठरला.

COMMENTS