नांदेड : ‘हर घर जल’चा गाजावाजा करत केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवले; मात

नांदेड : ‘हर घर जल’चा गाजावाजा करत केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवले; मात्र नांदेड जिल्ह्यात ही योजना आता अक्षरशः कागदोपत्रीच उरल्याचे वास्तव समोर आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जिल्ह्यातील शेकडो वाडी-वस्त्या आजही पाण्यासाठी भटकंती करत असून, जलजीवन मिशनच्या तब्बल 822 योजना अपूर्ण अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडून निधीच न मिळाल्याने जलजीवन मिशनची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. ठेकेदारांची जवळपास 150 कोटी रुपयांची बिले रखडल्याने अनेकांनी कामे बंद केली असून, प्रशासनाकडे केवळ आश्वासनांखेरीज काहीच उरले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटत आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2024 पासून या योजनेसाठी आवश्यक निधीच प्राप्त झालेला नाही. परिणामी, आधीच संथ गतीने सुरू असलेली कामे आता मृतावस्थेत गेली आहेत. वाढती महागाई, साहित्याच्या वाढलेल्या किमती आणि शासनाची उदासीनता यामुळे ठेकेदारांनीही हात टेकल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 1 हजार 234 पाणीपुरवठा योजनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 412 कामे पूर्ण झाली असून तब्बल 822 योजना अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पूर्ण झालेल्या कामांपैकीही केवळ 699 गावांमध्येच प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू आहे. सरकारने योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ दिली असली, तरी निधीअभावी ही मुदतही केवळ कागदावरील दिलासा ठरण्याची चिन्हे आहेत. मार्च 2025 पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी अनेक ठेकेदारांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून, कर्ज काढून कामे सुरू ठेवली. शासनाकडून वेळेत निधी मिळेल, या विश्वासावर त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली. मात्र दोन वर्षांपासून बिलेच न मिळाल्याने अनेक ठेकेदार आता आर्थिक गर्तेत सापडले आहेत. बँकांचे हप्ते, मजुरांची देणी आणि साहित्य पुरवठादारांचा तगादा यामुळे त्यांनी अखेर कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जलजीवन मिशनची जिल्ह्यातील भीषण स्थिती एकूण उद्दिष्ट : 1 हजार 234 योजना पूर्ण झालेली कामे : 412 अपूर्ण कामे : 822 पाणीपुरवठा सुरू असलेली गावे : 699 प्रलंबित निधी : 150 कोटी रुपये
अधिकार्यांची कबुली
जलजीवन मिशनच्या कामांसाठी मागील वर्षभरापासून आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील ठेकेदारांची जवळपास 150 कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने कामांची प्रगती थांबली आहे. शासनाकडे सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
– आर. डी. रावसाहेब, कार्यकारी अभियंता (प्रभारी),
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प. नांदेड

COMMENTS