देशपातळीवरील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मनमोहन कलंत्री तर राष्ट्रीय सल्लागार म्हणून सत्यनारायण कासट यांची तिसर्यांदा

देशपातळीवरील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मनमोहन कलंत्री तर राष्ट्रीय सल्लागार म्हणून सत्यनारायण कासट यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल कृषी साहित्य विक्रेता संघटना बीड जिल्हा आणि बीड तालुकाच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मनमोहन कलंत्री यांची तिसर्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणे हा केवळ त्यांचा सन्मान नसून बीड जिल्हा आणि मराठवाड्याचा अभिमान असल्याच्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. बीडचे भूमिपुत्र असलेल्या मनमोहन कलंत्री यांची नुकतीच कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्यांदा बिनविरोध निवड झाली. देशातील 22 राज्यांच्या प्रतिनिधींनी ही निवड केली. त्यांच्यासोबतच सत्यनारायण कासट यांची राष्ट्रीय सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. यानिमित्ताने बीडमध्ये कृषी साहित्य विक्रेते संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, जवाहर सारडा, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंगद नवले तसेच तालुकाध्यक्ष भीमराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजातील मान्यवर तसेच व्यापार्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मनमोहन कलंत्री यांच्या कार्याचा जिल्ह्याला अभिमान असल्याचे सांगितले. उपस्थितांनी मनमोहन कलंत्री आणि सत्यनारायण कासट यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयकिशोर बियाणी यांनी केले.
शेतकर्यांचे मित्र असल्याचे समाधान-कलंत्री
हा देश कृषिप्रधान आहे, मात्र शेतीकडे दुय्यम म्हणून पाहिले जाते. ज्या शेतकर्यांना सर्वजण दुय्यम समजतात, तोच खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. त्या शेतकर्यांचे आम्ही मित्र आहोत आणि त्यांच्यासाठी काम करता येते, याचे समाधान व आनंद आहे, असे मनमोहन कलंत्री यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, या संघटनेच्या माध्यमातून कृषी साहित्य विक्रेत्यांचे प्रश्न सोडवले जातात; मात्र त्याहीपेक्षा अधिक काम आम्ही शेतकर्यांसाठी करतो. या संघटनेच्या माध्यमातून आमचे अनेक ठिकाणी सत्कार झाले, मात्र आपल्या गावात आणि आपल्या माणसांनी केलेल्या सन्मानाचे मूल्य फार मोठे असून हा सन्मान अधिक आनंद देणारा आहे.

COMMENTS