गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. जगाची जीवनवाहिनी समजली जाणारी 'होर्मुजची सामुद्रधुन

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. जगाची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ रणांगण बनली असून, यादरम्यान एका भारतीय जहाजावर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाला आपला जीव गमवावा लागला आहे.
इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. होर्मुज खाडी गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने जागतिक ऊर्जेचं संकट उभं ठाकलंय. अमेरिकेने केलेली नाकेबंदी आणि इराणचा पलटवार यामुळे ही खाडी आता मृत्यूचा सापळा बनली आहे. यादरम्यान १८ खलाशी असलेल्या एका भारतीय जहाजावर ड्रोन किंवा क्षेपणास्त्राने मोठा हल्ला करण्यात आला.
हे जहाज समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भीषण हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला नक्की कोणी केला? इराण की अमेरिका? यावर अद्याप स्पष्टता मिळालेली नाही, कारण दोन्ही देशांनी या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. मात्र, भारतीय जहाजांना टार्गेट केलं जात असल्याने भारताची चिंता वाढली आहे.
या घटनेनंतर भारत सरकार तातडीने ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सतत जहाज मालकांच्या संपर्कात आहेत. जखमींना तातडीने उपचार मिळावेत आणि शहीद खलाशाचा मृतदेह सन्मानाने मायदेशी परत आणला जावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक भारतीय जहाजे अजूनही या युद्धक्षेत्रात अडकून पडली आहेत.
अमेरिकेचा अंदाज होता की हे युद्ध महिनाभर चालेल, पण दोन महिने उलटूनही तणाव कमी झालेला नाही. आता थेट भारताच्या जहाजावर हल्ला झाल्याने भारत सरकार या प्रकरणी काय कठोर भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS