11 एप्रिल 2026 क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 200वी जयंती संपूर्ण भारतात साजरी होत आहे त्यानिमित्ताने क्रांतीबांच्या गौरवशाली आणि प्रेरणादायी आद
11 एप्रिल 2026 क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 200वी जयंती संपूर्ण भारतात साजरी होत आहे त्यानिमित्ताने क्रांतीबांच्या गौरवशाली आणि प्रेरणादायी आदर्श जीवनपटावर टाकलेला लेखरुपी प्रकाश… स्त्री शिक्षणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्यांचं नाव लिहलं तरी ते कमीच पडेल असे क्रांतीसुर्य, महामानव, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीबा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची 11 एप्रिल 2026 रोजी 200 वी जयंती…
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी सर्व साक्षी जगत्पती नकोच त्याला मध्यस्ती असे म्हणत सत्याचा शोध घेण्यासाठी विषमतावादी वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले यांच्या मानवतावादी, सत्यवादी, वास्तववादी, बहुजनवादी विचारांचे महत्व सांगणार्या सत्यशोधकी विचारांची आज खर्या अर्थाने भारताला खरी गरज आहे. तत्कालीन परिस्थितीत सावकारी पाश आणि अस्मानी-सुलतानी संकटांनी शेतकरी गांजला होता पिचला होता शोषला जात होता. ’’शेतकर्याचा आसूड’’ या पुस्तकातून महात्मा फुलेंनी शेतकर्यांच्या शोषणाचे त्याच्या मागासलेपणाचे जिवंत चित्रण करून त्यांच्या या मागासलेपणाच्या कारणांचे विवेचन केले आहे. आज एकविसाव्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन सुविधा वाढल्या असल्या तरी शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत त्या तसूभरही कमी झालेल्या नाहीत. हमीभाव, हवामान बदल, शासकीय धोरण या आणि अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आजही बहुजन समाजातील मुख्य घटक असलेला शेतकरी रोजची आपली पोटाची खळगी भरण्याच्या संघर्षात हयात जात आहे .जलव्यवस्थापन आणि शेतीपूरक जोडधंदे आजही तितकेच गरजेचे आहेत हे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आजही प्रेरक ठरतात पण हे विचार काहीजण वाचतात काही वाचत नाहीत आणि वाचलेले अमलात आणत नाहीत ही पण आपल्या भारतीय समाजाची शोकांतिका आहे हे खेदाने म्हणावे लागेल.राज्यघटनेमुळे कायद्याने समानता आली असली तरी मानसिक स्तरावर जातीभेद आजही टिकून आहे. जोतिरावांनी अपेक्षित धरलेली ’मानवता’ आणि ’एकता’ आजही पूर्णपणे साध्य झालेली नाही. मनुवादी व्यवस्थेने शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते. महात्मा फुले यांनी विद्येविना मती गेली… या शब्दांत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणच तुमचा तारणहार आहे. पिढ्या न पिढ्यांचा उद्गारकर्ता आहे हा विचार त्याकाळी महात्मा फुल्यांनी जाणला आणि सर्वांपुढे तो मांडला. आजच्या पिढीने शिक्षणाचे महत्व जाणले पण शिक्षणातून स्वतःबरोबर समाजाचाही विकास साधायचा असतो हा विचार ते विसरले आहेत. शिक्षित सुशिक्षित झालेल्या समाजाला सुसंस्कृत बनवायचे असेल तर शिक्षित सुशिक्षित लोकांनी महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा वाचली पाहिजे आणि ती वैयक्तिक सामाजिक जीवन जगत असताना ती जगली पाहिजे हा विचारही फार महत्त्वाचा आहे. महात्मा जोतिराव फुले हे केवळ एक समाजसुधारक नाहीत तर ते आधुनिक भारताच्या सामाजिक,वैचारिक, सांस्कृतिक क्रांतीचे जनक आहेत त्यांनी मांडलेले विचार आणि केलेले कार्य आजही ’बहुजन समाजा’ साठी चंद्र-सूर्य असेपर्यंत दिशादर्शक ठरत राहतील हे अंतिम आणि निर्विवाद सत्य आहे.
महात्मा फुलेंनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले हे त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्री शिक्षिका बनवून प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले म्हणून ते फक्त बोलते सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. आजची भारतीय स्त्री शिकून स्वावलंबी आत्मनिर्भर सबला होत आहे ही केवळ त्यांच्याच विचारांची आणि कार्याची फलश्रुती आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या विरोधात महात्मा फुलेंनी सत्यशोधकी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला.आजच्या डिजिटल युगातही स्वतः मधील विवेक जिवंत ठेवून वागणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. ज्योतीरावांनी सांगितलेली वैचारिक गुलामगिरीतून मुक्ती’’अद्याप पूर्ण झालेली नाही. केवळ जयंतीच्या दिवशी एक दिवसापुरती घोषणा देऊन, डीजेवर गाण्यांवर नाचत मिरवणूक काढून आपण केवळ आनंद घेऊ शकतो जो केवळ मिथ्या आहे पण त्यांच्या कृतीशील विचारांची कास धरून उद्योग, शिक्षण, रोजगार, संशोधनात बहुजनांनी पुढे जाणेे हीच काळाची गरज आहे. आतापर्यंतचा इतिहासात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो हे आपण हजार वेळा ऐकले असेल पण यशस्वी स्त्री मागे एका यशस्वी पुरुषाचाही हात असतो याचा जगातले एकमेव उदाहरण म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले….. हजारो वर्ष अंधारलेल्या काळोखात खितपत पडलेल्या बहुजन समाजास शिक्षणाचा प्रकाश देणार्या भारताच्या महान पुत्रास स्त्रियांच्या उद्धारकर्त्यास कोटी कोटी वंदन… जय ज्योती, जय क्रांती, जय भारत…
संतोष जाधव सर मो : 9975418243

COMMENTS