Homeताज्या बातम्या

खोट्या गुन्ह्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा; खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केज : बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेला एक गुन्हा खोटा असल्याचे समोर आल्यानंतर, या प्रकरणी निष्पाप नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ

केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघातभवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
साबला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा ‘महिला सन्मान पुरस्कारा’ने गौरव
केज येथे सत्यमेव जयते फार्मर कप आणि उमेद अंतर्गत आयोजित गटबांधणी कार्यशाळा

केज : बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेला एक गुन्हा खोटा असल्याचे समोर आल्यानंतर, या प्रकरणी निष्पाप नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या आणि खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र पाठवले असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

खा. बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे की, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ३१ मे २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१९२ ची नोंद करण्यात आली होती. मात्र, हा गुन्हा नोंद झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदर गुन्हा खोटा असल्याची माहिती अधिकृतपणे दिली. जर एखादा गुन्हा खोटा असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडूनच स्पष्ट होत असेल, तर कोणतीही पुरेशी पडताळणी न करता असा गुन्हा नोंदवण्यामागची नेमकी जबाबदारी कोणाची? हे निश्चित करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाईमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते आणि पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे खोटा गुन्हा नोंदवण्यास जबाबदार असलेल्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या पत्राच्या प्रतिलिपि त्यांनी पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर) आणि पोलीस अधीक्षक (बीड) यांना पुढील योग्य कारवाईसाठी पाठवल्या आहेत.

जिल्ह्याची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी “यापूर्वी बीड जिल्ह्यात अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल होत असल्यामुळे जिल्ह्याची मोठी बदनामी झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील परिस्थितीत सुधारणा झाली असताना, आज पुन्हा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्यास कोण सांगत आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे,” असा थेट सवाल खा. बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

COMMENTS