Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय सीमारेषेवर ड्रोन आणि सेन्सरने निगराणी

नवी दिल्ली : देशाच्या सीमासुरक्षेला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत पावले उचलली असल्याचे गृह मंत्रालयाच्या

औषधांवर 100 टक्के आयात शुल्क; अमेरिकेच्या निर्णयाने पेेटंट औषधांची निर्यात महागणार
इराण युद्धादरम्यान लॉकडाउनची फेक नोटीस व्हायरल
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या; प्रति बॅरल 115 डॉलरच्या वर पोहोचल्या किंमती

नवी दिल्ली : देशाच्या सीमासुरक्षेला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत पावले उचलली असल्याचे गृह मंत्रालयाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सीमावर्ती भागात वाढत्या सुरक्षेच्या आव्हानांचा विचार करून आधुनिक साधनसामग्री, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ यांचा संगम साधत ड्रोन आणि सेन्सरवर आधारित बहुआयामी संरक्षण व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
भारताने अलीकडील अनुभवांचा धडा घेत सीमांवर अत्याधुनिक देखरेख प्रणाली कार्यान्वित केली आहे. पाकिस्तान व बांगलादेश सीमांवर ड्रोनविरोधी यंत्रणा, सेन्सर, उष्णतादर्शक कॅमेरे, रडार आणि लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून सतत निगराणी ठेवली जात आहे. ही व्यवस्था कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित ओळखून नियंत्रण केंद्रापर्यंत माहिती पोहोचवते. जम्मू परिसर तसेच आसाममधील धुबरी भागात सुमारे पाच किलोमीटर क्षेत्रात व्यापक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीचे प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून सीमावर्ती भागातील हालचालींचे अचूक निरीक्षण शक्य झाले आहे. पूर्वोत्तर राज्यांतील संवेदनशील भाग लक्षात घेऊन अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर येथे मिश्र देखरेख प्रणाली उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे जंगल आणि डोंगराळ भागातील घुसखोरी रोखणे सुलभ होणार आहे. सीमेवरून होणार्‍या ड्रोनद्वारे घुसखोरीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षा दलांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने अवैध उड्डाणे शोधून ती निष्प्रभ करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे हवाई मार्गाने होणार्‍या गैरकृत्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा आणि संवेदनशील क्षेत्रांचे अचूक नकाशांकन करण्यासाठी अवकाशाधारित तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. या प्रणालीमुळे नियोजन अधिक सुबक होत असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ओळखणे सुलभ झाले आहे. ही संपूर्ण यंत्रणा विविध स्तरांवर कार्यरत असून प्रत्येक हालचालीची माहिती तत्काळ अद्ययावत केली जाते. नियंत्रण केंद्रात बसलेल्या अधिकार्‍यांना परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेणे आणि कारवाई करणे शक्य होते. विविध सेन्सरमधून मिळणारा डेटा सुरक्षित संप्रेषण यंत्रणेद्वारे एकत्रित केला जातो. उत्तरेकडील सीमांवरही देखरेख मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. 2022 ते 2024 या कालावधीत एकूण 29 नवीन सीमाचौक्या उभारण्यात आल्या असून त्यांची एकूण संख्या आता 209 झाली आहे. या माध्यमातून दुर्गम हिमालयीन भागात वर्षभर उपस्थिती राखणे शक्य झाले आहे.


गस्तीमध्ये केली तिपटीने वाढ
पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यातील चकमक या घटनेनंतर सीमासुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यानंतर गस्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले असून सध्या दरमहा सुमारे पाचशे गस्त मोहीमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही संभाव्य धोक्याला त्वरित प्रतिसाद देणे शक्य होत आहे.

COMMENTS