Homeताज्या बातम्या

खा. डॉ.  गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यशसगरोळी कृषी विज्ञान केंद्राचा ’निक्रा-टीडीसी’ कार्यक्रमात समावेश

राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान, आधुनिक संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्र

 वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन
वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते; त्यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन उत्साहात साजरा – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड
हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप



राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान, आधुनिक संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला अखेर यश मिळाले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत सगरोळी (जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्राचा ’निक्रा-टीडीसी’ (हवामान बदलास अनुकूल कृषी नवकल्पना – तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घटक) या कार्यक्रमात सन 2026-27 पासून समावेश करण्यात आला आहे.
दि. 27 मार्च 2026 रोजी राज्यसभेत तारांकित प्रश्न क्रमांक 362 द्वारे खा. डॉ. गोपछडे यांनी नांदेड येथे केंद्रीय कोरडवाहू कृषी संशोधन संस्था (क्रिडा)चे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याबाबत सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच मागील तीन वर्षांत संस्थेने विकसित केलेल्या कृषी तंत्रज्ञान, नवकल्पना, त्यांचा शेतकर्‍यांवरील परिणाम आणि त्या परिणामांचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यात आले आहे का, याचीही माहिती मागितली होती. यावर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सभागृहात उत्तर देताना परभणी येथील विविध कृषी संशोधन प्रकल्प आणि ’निक्रा-टीडीसी’ केंद्रांच्या माध्यमातून नांदेडसह मराठवाड्यातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन दिले जात असल्याचे सांगितले. तसेच कृषी विज्ञान केंद्रे ही क्रिडा संस्थेच्या तंत्रज्ञान प्रसाराची स्थानिक केंद्रे म्हणून कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेतील चर्चेनंतर आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने 25 मे 2026 रोजी नांदेड येथे संबंधित अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि विविध संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीतील कार्यवृत्ताच्या आधारे सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचा ’निक्रा-टीडीसी’ कार्यक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 30 जून 2026 रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून अधिकृत कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला. या आदेशात हा निर्णय राज्यसभेत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने घेण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. एल निनोसदृश हवामान परिस्थितीमुळे निर्माण होणार्‍या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय नांदेड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या माध्यमातून हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान हस्तांतरण, शेतकरी प्रशिक्षण, क्षमता विकास, संशोधन आणि तांत्रिक मार्गदर्शन अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, राज्यसभेत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेचे हे ठोस फलित असल्याची चर्चा कृषी क्षेत्रात होत आहे.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेडला मोठा लाभ
सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचा ’निक्रा-टीडीसी’ कार्यक्रमात समावेश झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यात हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान हस्तांतरण, शेतकरी प्रशिक्षण, संशोधन आणि तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे राबविले जाणार आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेती अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.

COMMENTS