Homeताज्या बातम्या

आईचा जीव घेतल्यानंतर मुलानेही संपविले जीवन; नांदेडच्या राहुल कॉलनीत खळबळ

नांदेड : शहरातील तरोडा भागातील राहुल कॉलनी येथे शनिवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मानसिक तणावातून असल्याचे सांगित

कारगील विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून शहीद वीरांना कृतज्ञ अभिवादन
पाटेगाव सोसायटीच्या नवीन इमारतीचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; सहकार मजबूत करण्याचे आवाहन
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुक्ततेविरोधात हायकोर्टात दाद मागणार : बजरंग पूनिया

नांदेड : शहरातील तरोडा भागातील राहुल कॉलनी येथे शनिवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मानसिक तणावातून असल्याचे सांगितल्या जाणार्‍या 26 वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या आईवर बॅट व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रतीक बालाजी चौथरे असे या तरुणाचे, तर भारती बालाजी चौथरे असे मृत आईचे नाव आहे.

राहुल कॉलनी येथे बालाजी सोपान चौथरे हे कुटुंबासह राहत असून ते केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबातील मुलगी प्राची ही पुणे येथे शिक्षणासाठी राहते. त्यामुळे राहुल कॉलनीतील घरी बालाजी चौथरे यांच्या पत्नी भारती आणि मुलगा प्रतीक हे दोघे राहत होते. शनिवारी, 8 ऑगस्ट रोजी सायंकाळपासून चौथरे यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. मात्र, नेमका प्रकार काय आहे, याची कल्पना शेजार्‍यांना आली नाही. रात्री उशिरा घरातील परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती समोर आली. प्रतीकने बॅट आणि लोखंडी रॉडने आई भारती यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच प्रतीकनेही गळफास घेऊन जीवन संपविल्याचे आढळून आले.

प्रतीक हा मागील काही वर्षांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती नातेवाइकांकडून मिळाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून तो नैराश्याचा सामना करीत होता आणि त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जोशी यांच्याकडे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. उपचार सुरू असतानाच त्याने आईवर जीवघेणा हल्ला करून स्वतःचेही जीवन संपविल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यापूर्वी घरात काय घडले आणि प्रतीकच्या मानसिक अवस्थेचा या घटनेशी नेमका संबंध काय होता, याचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी मयत भारती चौथरे यांचे बंधू मधुकर सताजीराव झगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात प्रतीक चौथरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील उपलब्ध पुरावे, नातेवाईक व शेजार्‍यांचे जबाब तसेच अन्य बाबींच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने राहुल कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मानसिक तणाव आणि नैराश्याची लक्षणे असलेल्या व्यक्तींकडे कुटुंबीयांनी संवेदनशीलतेने लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि आवश्यक तेव्हा तज्ज्ञांची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.

COMMENTS