बेलापूर: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सातत्याने घटत असून, मातीचे परीक्षण करून आवश्यकतेनुसार संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनवाढीसह जमिनी

बेलापूर: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सातत्याने घटत असून, मातीचे परीक्षण करून आवश्यकतेनुसार संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनवाढीसह जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय समन्वित माती परीक्षण व पीक प्रतिसाद संशोधन प्रकल्प, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (भोपाळ), मृदाशास्त्र विभाग आणि बेलापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भीमराव कांबळे होते.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवी, जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, चंद्रकांत नवले, पत्रकार देविदास देसाई, प्रदीप आहेर, सुहास शेलार, रावसाहेब अमोलीक, बंटी शेलार, पोपट पवार, विनायक जगताप, सचिन अमोलीक, तानाजी शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात लाभार्थी शेतकऱ्यांना ‘फुले मायक्रोग्रेड-२’ (द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य) आणि ‘फुले बायोमिक्स’ (जीवाणू संवर्धन) यांसह विविध कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ. क्रांती पाटील यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. विजयकुमार पाटील यांनी संतुलित खत व्यवस्थापन आणि फुले मायक्रोग्रेड व फुले बायोमिक्सच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. आनंदराव जाधव यांनी सेंद्रिय कर्ब हा मातीचा कणा असल्याचे सांगत संतुलित खत व्यवस्थापनातून मातीचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले. डॉ. शुभांगी कदम यांनी मातीचे नमुने योग्य पद्धतीने कसे घ्यावेत आणि माती परीक्षणाचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
बेलापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने संकलित करून परीक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय व कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शरद नवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी पौर्णिमा गाडे आणि कृषी सहाय्यक ज्योती वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS