नांदेड : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री परशुराम तेजोत्सवाचा समारोप आज, रविवारी (दि. १९ एप्रिल) सायंकाळी होणार आहे. श्री परशुराम

नांदेड : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री परशुराम तेजोत्सवाचा समारोप आज, रविवारी (दि. १९ एप्रिल) सायंकाळी होणार आहे. श्री परशुराम जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात सायंकाळी ७ ते १०.३० या वेळेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी ‘परशुरामांची शिष्य परंपरा’ या विषयावर काळाराम मंदिर, नाशिक येथील महामंडलेश्वर महंत सुधीरदासजी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ‘म्युझिकल स्क्वेअर’ प्रस्तुत ‘भक्ती संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमात धीरज पोळ, संतोष कुलकर्णी, सुशांत पांडे व प्रणीती बिलोलीकर आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत आडे (पुणे) करणार आहेत.
दरम्यान, परशुराम जयंतीनिमित्त परशुराम चौक, रिंग रोड, काबरा नगर येथे नगरसेवक आशिष नेरलकर, अनिल डोईफोडे, मनीषा कुणसावळीकर, पांडे काका, डॉ. मुकुंद मुळे, कुलकर्णी यांच्या पुढाकारातून परशुराम चौकाच्या पाठीचे पूजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘ब्रह्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच समाजहितासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टर, वकील, उद्योजक व पत्रकारांना ‘ब्रह्ममित्र’, ‘रेणुकाई’ व ‘गोदाई’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी व नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. महोत्सवाचे आयोजन निखिलभाऊ लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
नांदेडमधील नागरिकांनी, विशेषतः महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरप्रमुख केदार नांदेडकर, महानगराध्यक्ष श्रीकांत वैद्य, जिल्हाप्रमुख अनंत राखे, महिला जिल्हाप्रमुख भाग्यश्री कुलकर्णी व प्रीतीताई वडवळकर यांनी केले आहे.

COMMENTS