Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तेजोत्सवात उद्या ज्ञानपर्व : अतुल शास्त्री भगरे गुरुजींचे व्याख्यान, उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड : नांदेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी धार्मिक, सामाजिक आणि वैचारि

संभवामि युगे युगे नृत्याविष्काराने नांदेडकर मंत्रमुग्ध
सुनील जोशी यांना ब्राह्मण महासंघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
परशुराम जयंतीच्या पूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करा; महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावे

नांदेड : नांदेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक पर्व रंगणार असून ज्येष्ठ प्रवचनकार अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा, पुरस्कार प्राप्त सामाजिक, प्रशासकीय, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत.
सायंकाळी 7:00 ते 10:30 या वेळेत ‘प्रत्येक युगातील ब्राह्मण’ या विषयावर ’झी मराठी फेम’अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे व्याख्यान होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक तथा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांनी दिली आहे.  त्यानंतर भगवद्गीतेतील 18 व्या अध्यायांवर आधारित ‘संभवामि युगे युगे’ हा नृत्याविष्कार गुरु सोनाली करंदीकर आणि त्यांच्या नाशिक येथील शिष्यांकडून सादर केला जाणार आहे. श्री परशुराम तेजोत्सवानिमित्त शहरात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक कार्यक्रम, पूजन विधी, समाजप्रबोधनपर उपक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तेजोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागले असून भगरे गुरुजी आपल्या ओजस्वी वाणी, अभ्यासपूर्ण मांडणी आणि संस्कारमूल्यांनी युक्त विचारांमुळे श्रोत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्याख्यानातून धर्म, कर्तव्य, संस्कृती आणि आधुनिक जीवनमूल्यांचा समन्वय साधणारे मार्गदर्शन मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कार्यक्रमस्थळी भाविक व नागरिकांची मोठी उपस्थिती राहणार असल्याने आयोजकांनी नियोजनबद्ध तयारी केली आहे. बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच सुरक्षा व्यवस्था यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला वधू -वर मेळावा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. श्री परशुराम तेजोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकात्मता, संस्कार संवर्धन आणि वैचारिक प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. उद्याच्या कार्यक्रमामुळे परशुराम तेजोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे.

COMMENTS