बँकॉक : थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी

बँकॉक : थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. राजधानी बँकॉकजवळील नॉनथाबुरी जिल्ह्यातील देबसिरिन शाळेत ही घटना घडल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एका विद्यार्थ्याने परिसरात अचानक गोळीबार सुरू केला. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बचाव कार्यात सहभागी स्वयंसेवकांना गोळीबाराची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अधिकृत मृतांची संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोळीबार करणार्या विद्यार्थ्याने नंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.
घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये रुग्णवाहिका आणि बचाव पथके शाळेत दाखल झाल्याचे, तसेच घाबरलेले विद्यार्थी शाळेबाहेर धावत असल्याचे दिसून आले. या घटनेचे थेट दृश्य समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. मात्र, सुरक्षायंत्रणांनी नागरिकांना आणि प्रसारमाध्यमांना संवेदनशील दृश्ये व अपुष्ट माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे. थायलंडचे शिक्षणमंत्री प्रसर्ट चंतारारुआंगथोंग यांनी घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, जखमी तसेच मानसिक धक्का बसलेल्या व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय व समुपदेशनाची मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, मृत किंवा जखमी व्यक्तींची ओळख उघड करणारी छायाचित्रे, दृश्ये अथवा अपुष्ट माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये. अशा कृतीमुळे संबंधित कुटुंबीयांच्या गोपनीयतेवर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीसांकडून सुरू असून, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

COMMENTS