कोपरगाव : इन्स्टाग्रामवर हातात रायफल व कमरेला पिस्टल असल्याचा फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

कोपरगाव : इन्स्टाग्रामवर हातात रायफल व कमरेला पिस्टल असल्याचा फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तौफीक बिलाल बागवान (वय २६) व इस्माईल रज्जाक शहा (वय ३९, दोघे रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांना तौफीक बागवान याने त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर रायफल व पिस्टलसह फोटो अपलोड केल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित इन्स्टाग्राम खाते तौफीक बागवान याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, इस्माईल शहा याने मोबाईलमधील फोटोवर ‘जेमिनी एआय’चा वापर करून तौफीकच्या हातात ए.के.-४७ रायफल व कमरेला पिस्टल दाखवणारा बनावट फोटो तयार केला होता. हा फोटो तौफीकला पाठविण्यात आला आणि त्याने तो ‘tohfik-5457’ या इन्स्टाग्राम आयडीवर प्रसारित केल्याचे उघड झाले.
दरम्यान, तौफीक बागवान याच्या घरझडतीत एक तलवार जप्त करण्यात आली आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असतानाही हा फोटो प्रसारित केल्याने पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या पथकाने केली. हे प्रकार समजला धोकादायक असून पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे नागरिक सांगत आहेत.


COMMENTS