रायगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून, नागरिकांच्या

रायगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या प्रभावी समन्वयातून आतापर्यंत 200 हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावांतील 265 कुटुंबांमधील 937 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, दि.6 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 236.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खालापूर तालुक्यात सर्वाधिक 323.3 मि.मी., महाडमध्ये 272.2 मि.मी. तर सुधागडमध्ये 268.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतही 150 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लोणावळा येथे 625 मि.मी. तर महाबळेश्वर येथे 463 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सकाळी 11 वाजता च्या अहवालानुसार सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, पाताळगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना पब्लिक ड्रेस सिस्टीमद्वारे सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत. संभाव्य धोक्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरावर भर देण्यात आला आहे.

COMMENTS