Homeताज्या बातम्या

दीड कोटींचे शेवगाव वन पर्यटन केंद्र कायम कुलूपबंद; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाचा मूळ उद्देशच धोक्यात

oplus_2097152 शेवगाव : शेवगाव-पाथर्डी राज्य मार्गावर, शेवगाव शहरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाने पाच हेक्टर क्षेत्रात उभारलेले वन पर

पारनेरमध्ये अवकाळीचा तडाखा; वादळी पाऊस अन् गारपिटीने टोमॅटो, आंबा बागा उद्ध्वस्त
शासकीय शाळांसमोर अस्तित्वाचे आव्हान! पहिलीच्या प्रवेशसंख्येत सलग घट; प्रत्येक बालक शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाची व्यापक मोहीम
पत्रकारांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; शेवगाव पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांचे कारवाईसाठी निवेदन
oplus_2097152

शेवगाव : शेवगाव-पाथर्डी राज्य मार्गावर, शेवगाव शहरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाने पाच हेक्टर क्षेत्रात उभारलेले वन पर्यटन केंद्र सध्या दुर्लक्ष, अपूर्ण कामे आणि देखभालीअभावी ओस पडले आहे. सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शासनाच्या वनसंवर्धन आणि पर्यटनवृद्धीच्या मूळ उद्देशालाच तडा जात असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

वन विभागाने या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणे, वनक्षेत्राबद्दल जनजागृती करणे तसेच प्राणी-पक्षी आणि वनस्पती संवर्धनाला हातभार लावणे हा मुख्य उद्देश ठेवला होता. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ उभारलेला सांगाडाच दिसून येतो. परिसरात पर्यटकांची कोणतीही वर्दळ दिसत नसून, पाण्याचा योग्य पुरवठा नसल्याने लावलेली अनेक झाडे अक्षरशः करपून गेली आहेत. पाथर्डीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प उभारण्यात आला होता. शासनाचा मोठा निधी खर्चूनही या केंद्राकडे जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून येथे पोहोचताना नागरिकांना वेड्या बाभळीच्या झुडपांतून वाट काढावी लागते.

गेल्या तीन वर्षांपासून हा वन पर्यटन प्रकल्प कागदोपत्री कार्यान्वित असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात येथे नेमणूक असलेले वनमजूर आर. एस. चितळे हे नियुक्तीस्थळी सहसा उपस्थित नसल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे देखभालीसाठी जबाबदार व्यक्ती नेमकी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असल्याची भावना व्यक्त होत असून, या केंद्राची तातडीने दुरुस्ती करून रस्ता व पाण्याची सुविधा देण्याची मागणी होत आहे.

अधिकारी प्रशिक्षणाला; मजूर नियुक्तीबाबत चर्चा

सध्या शेवगाव वनपरिक्षेत्राचा कार्यभार संदीप एकशिंगे यांच्याकडे असून, ते महिनाभराच्या दीर्घकालीन प्रशिक्षणासाठी चंद्रपूर येथे गेले आहेत. त्यामुळे येथील अतिरिक्त पदभार बबन मंचारे यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, वनमजूर चितळे यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केल्यानंतर वन विभागात हालचाली सुरू झाल्याचे समजते. याविषयी बोलताना एकशिंगे यांनी सांगितले की, “पर्यटन केंद्राची काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. नियमित देखभालीसाठी रोजंदारीवर मजूर उपलब्ध करून देण्याबाबत आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या नियोजनाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.”

COMMENTS